बीड | Beed
सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना इशारा देत परभणीत आक्रमक वक्तव्ये केली होती. आक्रमक झालेल्या मुंडे समर्थकांनी जरांगे-पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने मनोज जरांगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जरांगे यांच्या विरोधात बीडमध्ये प्रचंड आंदोलन सुरू आहे. या सर्व मुद्द्यावर जरांगे यांनी भाष्य केले आहे.
संतोष देशमुख हे गावाचे प्रमुख आणि सरकारमधील एक घटक होते. संतोष देशमुख यांचा खून केल्यानंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांना अरेरावी करण्यात येते. त्याबद्दल बोलायचे नाही का? मग आम्ही कोणता जातीयवाद केला दाखवा बरे? असा संतप्त सवाल जरांगे-पाटील यांनी उपस्थित केला आहे. मुंडे घराण्याच्या मनाविरुद्ध बीडमध्ये कधीच काही झाले नाही. पहिल्यांदाच या घराण्याच्या मनाविरुद्ध संतोष देशमुख हत्याकांडाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा राग म्हणूनच माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा दावा करतानाच आंदोलन करणारे हे मुंडेंचे लाभार्थी आहेत, असा टोलाही मनोज जरांगे पाटील यांनी लगावला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले, आरोपींना संतोष देशमुख यांचा खून पचवायचा होता, हे माझे मत आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो. पण आम्ही मस्साजोगला बसून गुन्हा दाखल करून घेतला. गुन्ह्यात आरोपींची नावे टाकून घेतली. हीच त्यांची खदखद होती. यांच्या मनाविरुद्ध आतापर्यंत बीड जिल्ह्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. म्हणून यांची माझ्यावर जळजळ आहे. नाराजी आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
कुणाची शाळा हडप, कुणाचा प्लॉट हडप, शेत हडप, कॉन्ट्रॅक्ट बळकव, असे प्रकार सर्रासपणे सुरू होते. पण आम्ही गुन्हा दाखल करून घेतला. त्यामुळे त्यांची आमच्यावर नाराजी होती. म्हणूनच माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, असा दावा मनोज जरांगे यांनी केला.
जरांगे-पाटील म्हणाले, “आजपर्यंत मी राज्यातील एकाही जातीला दुखावले नाही. नेते कुणाचेच नसतात. नेत्यांना बोलायचे नाही? अशीच मस्ती करून द्यायची का? खून पाडायचे का? धनंजय देशमुखांचा देखील खून पाडण्याचा प्लॅन आहे का तुमचा? धनंजय देशमुखांच्या बाजूने बोलायचे नाही का? कुठल्या वंजाऱ्याला, धनगर, दलित, मुस्लिमांना आम्ही बोललो नाही.”
मुंडे घराण्याने स्वत:च्या हाताने त्यांची पत घसरवली आहे. त्यांचा सर्वांनाच त्रास होता. ठरावीक लोक इतरांना त्रास देत होते. जातीचा काही संबंध नव्हता. फक्त काही लोकं सर्वांना त्रास द्यायचे. आता माझ्या विरोधात जे आंदोलन करत आहेत ते या घराण्याचे लाभार्थी आहेत. या लोकांनी ओबीसींचं आरक्षणही खाल्लं आहे. तेच माझ्याविरोधात आंदोलन करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
“नेते गुंडगिरी सांभाळत आहेत. सत्ता आणि पैसा मिळवण्यासाठी एक टोळके नेटवर्क काम करत आहे. मग हे टोळके धमकी, अरेरावी, शिव्या देण्याची कामे करतात. हे सरकारला रोखायचे नाही का? सरकार रोखत नसले, तर जनता रोखणार ना… अरेरावी करणाऱ्यांना आम्ही बोललो, तर बाकीच्या समाजाला लागण्याची गरज काय?” असा प्रश्न जरांगे-पाटलांनी विचारला आहे.