नाशिक | Nashik
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.१२) रोजी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांच्या विजयासाठी नाशिक (Nashik) येथे आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीच्या विजयासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच अपक्ष उमेदवार गोकुळ गिते (Gokul Gite) यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ आपली उमेदवारी मागे घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले.
या बैठकीस (Meeting) मंत्री दादा भुसे, नरहरी झिरवाळ आमदार माणिकराव कोकाटे, राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे, नितीन पवार, दिलीप बनकर, पंकज भुजबळ, माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह आदी नेते उपस्थित होते. मात्र, राष्ट्रवादीचे इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर हे गैरहजर होते. त्यामुळे त्यांच्या नाराजीची चर्चा रंगली होती. यानंतर आता खोसकर यांचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
खोसकर यांनी व्हिडीओमध्ये (Video) म्हटले की, “नरेंद्र दराडे यांनी निवडणुकीनंतर जमिनीवर राहावे. त्यांनी त्यांच्या कामकाजात थोडी सुधारणा करावी. मागील निवडणुकीत आम्ही त्यांना मदत करून देखील त्यांनी मतदारसंघात गेल्या सहा वर्षांत एकही काम केले नाही. त्यामुळे त्यांच्या कामकाजावर मतदार नाखूश आहेत”, असे म्हटले. तसेच आम्ही महायुतीचा धर्म पाळणार असून, निवडणुकीत त्यांना मदत करणार आहोत”, असेही खोसकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आमदार हिरामण खोसकर (MLA Hiraman Khoskar) यांनी दराडे यांच्यावर टीका केल्यानंतर नाशिक विधानपरिषदेचे माजी पराभूत उमेदवार शिवाजी सहाणे यांनी खोसकरांवर गंभीर आरोप करत हल्लाबोल केला आहे. याबाबत सहाणे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर (Facebook Account) पोस्ट केली आहे.
पोस्टमध्ये काय म्हटलंय?
शिवाजी सहाणे (Shivaji Sahane) यांनी पोस्टमध्ये म्हटले की, खोसकर साहेब २०१८ मध्ये मी सध्या तुम्ही आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार होतो. त्यावेळी तुम्ही विरोधी उमेदवार नरेंद्र दराडेंना मदत केली आणि पक्षविरोधी काम केले याचा हा कबुलीजबाब म्हणायचा का? विशेष म्हणजे ज्या स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कृपेने तुम्ही आमदार झाले आहात ते अजित पवार माझ्या निवडणुकीचे सूत्रधार होते म्हणजे तुम्ही त्यांनाही धोका दिला असे म्हणायचे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.




