परभणी । Parbhani
मागील काही महिन्यांपासून पडद्यामागे सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ची (Operation Tiger) आता उघड चर्चा सुरू झाली असून, राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे (Shivsena UBT) गटाचे काही विद्यमान खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी आता चांगलाच जोर धरला आहे. यातच केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलेल्या एका खळबळजनक दाव्यामुळे या चर्चांना अधिकृत बळ मिळाले आहे.
“ऑपरेशन टायगर आता केवळ नावापुरते उरलेले नसून ते पूर्णत्वाकडे गेले आहे. हे ऑपरेशन सध्या आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्या दिवशी योग्य वेळ आणि मुहूर्त ठरवतील, त्याच दिवशी हे ऑपरेशन अधिकृतपणे पूर्ण होईल,” असा खळबळजनक दावा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केला आहे.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात एका कार्यक्रमासाठी आले असता, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा अत्यंत मोठा दावा केला. विशेष म्हणजे, या ऑपरेशनला ठाकरे गटाचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अप्रत्यक्षपणे कबुली दिली असल्याचा दाखलाही जाधवांनी दिला. “अंबादास दानवे यांनी स्वतः यावर भाष्य करून एक प्रकारे शिक्कामोर्तब केले आहे, त्यामुळे आता आम्हाला वेगळे काही बोलण्याची गरजच उरलेली नाही,” असे स्पष्ट करत जाधवांनी ठाकरे गटाला कोंडीत पकडले.
काही दिवसांपूर्वी अंबादास दानवे यांनी “काही लोक संपर्कात आहेत आणि काही उघड बोलत आहेत, आम्हाला सर्व ठाऊक आहे. लोकसभा निवडणुकीपासून दर महिना-दोन महिन्यांनी ही चर्चा होते, आता हे एकदाचे अधिकृत मान्य करायला हवे,” असे विधान केले होते. दानवे यांच्या याच विधानाचा आधार घेत महायुतीने ठाकरे गटाची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे.
दुसरीकडे, या विधानांमुळे संतप्त झालेल्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत तीव्र शब्दांत महायुतीवर पलटवार केला आहे. “ही महाराष्ट्राच्या राजकारणातील विकृती असून त्यांनी आता कळस गाठला आहे. यांनी संपूर्ण महाराष्ट्र नासवला असून, महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता योग्य वेळी या विरोधात नक्कीच बंड करेल,” असा इशारा राऊत यांनी दिला. तसेच, ‘ऑपरेशन टायगर’ची भाषा करणाऱ्यांना टोला लगावत, “अमित शाह यांनी स्वतः यांचे किती वेळा ऑपरेशन केले आहे, हे आधी त्यांनी तपासावे,” अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
या संपूर्ण राजकीय घडामोडींचे गांभीर्य ओळखून शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे तातडीने अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. संभाव्य फूट रोखण्यासाठी आणि पक्षांतर्गत रणनीती आखण्यासाठी त्यांनी उद्या, १४ जून रोजी मुंबईतील ‘मातोश्री’ निवासस्थानी आपल्या सर्व खासदारांची अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बैठक बोलावली आहे. सर्व खासदारांना तातडीने मुंबईत पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बैठकिकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत.




