Thursday, April 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजManoj Jarange Patil: "सरकारने गोळ्या घातल्या, जेलमध्ये टाकले तरी मागे हटणार नाही";...

Manoj Jarange Patil: “सरकारने गोळ्या घातल्या, जेलमध्ये टाकले तरी मागे हटणार नाही”; मनोज जरांगेंचा मुंबईतून एल्गार

मुंबई | Mumbai
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आज (29 ऑगस्ट) आझाद मैदानामध्ये आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे.जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला प्रारंभ करताना सरकारला सुद्धा गर्भित इशारा दिला आहे. मागण्यांची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मुंबई कदापि सोडणार नाही, सरकारने मला गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही जेलमध्ये टाकले तरी जेलमध्ये सुद्धा आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी हजारो मराठा आंदोलकांसमोर दिला.

मनोज जरांगे पाटील आज सकाळी मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाले. हजारो आंदोलकांच्या गर्दीतून त्यांच्या गाडीला वाट काढणेही मुश्किल झाले होते. अखेर दहा वाजेच्या सुमारास ते आझाद मैदानात आले आणि मंचावर चढून छत्रपती शिवरायांना अभिवादन करून त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. मुंबईत जाळपोळ किंवा दगडफेक करू नका असे सांगत जरांगे पाटील यांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केले. आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी इथे आलो आहोत. शांततेत रहा, गडबड गोंधळ करून नुकसान करून घेऊ नका असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मुंबई आज मराठ्यांनी जाम करून दाखवली आहे. मात्र, सरकारने आपल्याला सहकार्य केले आहे. आपल्याला आंदोलनाला परवानगी दिली आहे. त्यामुळे आपण सुद्धा पोलिसांना आणि सरकारला सहकार्य करणार आहे. आझाद मैदानामध्ये आज उच्च न्यायालयाकडून एकदिवसीय आंदोलनाची परवानगी देण्यात आल्यानंतर जरांगे पाटील आंतरवाली सराटी ते मुंबई असा प्रवास करत पोहोचले आहेत. मुंबईमध्ये अभूतपूर्व गर्दी झाली असून सर्वत्र मराठ्यांचे वादळ दिसून येत आहे.

आपल्या सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मी मागे हटणार नाही. सरकारने गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही असा पुनरुच्चार त्यांनी केला. डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय आता इथून हटणार नाही असे ते म्हणाले. सरकारने बेमुदत उपोषण करू द्यावे, मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका असेही जरांगे यांनी यावेळी म्हटले.

जरांगेनी मराठा बांधवांना शांत राहण्याचे आवाहन करत सांगितले की, सोमवारी-मंगळवारी महाराष्ट्राने सहकार्य नाही केले तर मुंबईमध्ये पुन्हा यायचे. आरक्षणाची जबाबदारी माझ्याकडे, शांततेत राहून सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची. आपल्या रस्त्यावरील गाड्या काढायच्या आहे पार्किंगमध्ये पोलिस सांगतील तिथे लावायची. स्वत: तुम्ही स्वंयसेवक म्हणून काम करायचे. दोन तासांत मुंबई रिकामी झाली पाहिजे. उपोषणाला बसल्यानंतर मला बोलता येणार नाही. पोलिस नाराज झाले नाही पाहिजे, वाहतूक कोंडी झाली हे ऐकायला आले नाही पाहिजे. आपण आझाद मैदानात यायचे होते आलो. दारू पिऊन धिंगाणा करू नका, समाजाची मान खाली जाईल असे वागू नका.’

कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय. समाजाला कुटुंब मानलेय. मी तुमच्या कुटुंबातील आहे, तर माझा शब्द खाली पडू देऊ नका. मी कुटुंबासाठी लढतोय. माझ्या कुटुंबाची राखरांगोळी झाली तरी चालेल, पण समाज उभा राहिला पाहिजे. जे मैदान दिलेय, तिथेच राहायचे अन् झोपायचे. मी आझाद मैदानावर आहे, म्हटल्यावर तुम्ही घरात निवांत झोपा.’

ते पुढे म्हणाले की कोण काय सांगतेय, कोण राजकीय पोळी भाजतेय, त्यासाठी कोणी आपल्या आंदोलनात वापर करत आहे का? हे गांभीर्याने पाहून घ्या असे त्यांनी सांगितले. आंदोलनाला बट्टा लावायचा नाही. मी मरण पत्करायला तयार आहे, पण आता मागे हटायचे नसल्याचे त्यांनी सांगितले. जोपर्यंत आपल्याला विजय मिळत नाही तोपर्यंत आपण इथून हटणार नसल्याचे ते म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Fraud News : सराफाकडून २५ लाखांचा अपहार; वाढीव सोन्याच्या स्कीमध्ये...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik सराफ बाजारातील एका सराफ व्यावसायिकाने जादा परताव्याचे आमिष दाखवून तब्बल २५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हडप केल्याचा प्रकार उघडकीस...