छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagar
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणी विरोधकांनी महायुती सरकारला (Mahayuti Government) कोंडीत पकडले आहे. राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड (Walmik Karad) यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर परभणी, बीड, पुणे आणि आता पैठणमध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला सुरेश धस यांच्यासह मराठा नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) हे देखील उपस्थित होते. यावेळी जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला, तसेच काही आरोपही केले. यावेळी जरांगे म्हणाले की, दोन्ही प्रकरणातील एकही आरोपी सुटला तर गाठ ही आमच्यासोबत आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा, सर्व धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे षडयंत्र आहे, असा आरोपही जरांगे यांनी लावला.
ते म्हणाले की, “धनंजय मुंडे हे जातीय वादाच्या दिशेने जात असून त्यांनी माणूसकीची हत्या करण्याचे काम करू नये. संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. मुलीच्या न्यायासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. धनंजय मुंडेंनी काय करावे काय नाही हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना हे कळत नाही की एका लेकीने आपला वडील, एका भावाने आपला भाऊ गमावला आहे. धनंजय मुंडे आणि त्यांच्या टोळीने आरोपीला साथ देऊ नये, मुंडेंनी कुणाला वाचवू नये, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी”, असे जरांगेंनी म्हटले.
तसेच संतोष देशमुखांच्या भावाला धमक्या दिल्यानंतर आपण त्या गुंडांच्या विरोधात बोललो, तर आपल्यावरच केसेस दाखल करण्याचे षडयंत्र केले जात आहे. हे काम धनंजय मुंडे यांच्या लाभार्थी बगलबच्चे करत आहेत. तुमच्या लाभार्थी टोळींना आंदोलनं करायला लावता, आरोपीच्या मागे उभे राहता. हे चुकीचे नाही का? उद्या तुमच्या घरातील कुणी मेले तर मराठ्यांनी सुद्धा असेच मोर्चे काढायचे का? जर आरोपीला साथ द्यायची असे झाले तर राज्यात इतर ठिकाणीही असेच प्रकार घडतील,” असेही जरांगे म्हणाले.
जरांगे पुढे म्हणाले की,”सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या हत्येतील एकही आरोपी सुटला तर सरकारची आमच्याशी गाठ आहे. धनंजय मुंडेंनी जे प्रयोग सुरू केले असून षड्यंत्र आखले आहेत, त्यामुळे त्यांचे पाय अजून खोलात जातील. धनंजय मुंडे हे त्यांच्या गुंडांच्या टोळीच्या जीवावर उभे आहेत. धनंजय देशमुखांना जर कुणी धमकी देत असेल तर त्याला सोडणार नाही. गुंडांना बोलायचे नाही का? आम्ही कुणाच्या जातीला धमकी दिली नाही. पण नेत्याला आम्ही सोडणार नाही. स्वतःचे पाप झाकण्यासाठी ओबीसींचा आसरा घेतला जात आहे. पाप करणार तुम्ही, आणि ओबीसींच्या मागे उभे लपायचे. धनंजय मुंडेंनी पीक विमा खाणाऱ्या, राख खाणाऱ्या टोळ्या आणल्या. या नासक्या पाच पन्नास लोकांनी त्यांच्या जातीची बदनामी केली”, अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.