आरडगाव |वार्ताहर| Aradgav
राहुरी-मांजरी रस्त्यालगत मानोरी (Manori) येथे ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर भर दुपारी घरफोडी (Burglary) होऊन सुमारे 80 हजाराचे रुपयांचा ऐवज लंपास झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राहुरी (Rahuri) तालुक्यातील मानोरी येथे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शेतकरी खंडूजी तुकाराम कळमकर यांच्या कुटंबातील सदस्या घरा शेजारील सुमारे पाचशे मीटर अंतरावर असलेल्या शेतात कापूस (Cotton) वेचणीसाठी गेले असता त्यांच्या पाठीमागे अज्ञात व्यक्तीने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सुमारे 20 हजार रुपये रोख रक्कम अर्धा तोळा सोन्याची अंगठी, लक्ष्मी मातेची चांदीची मूर्ती असे ऐवज चोरून नेला. तसेच घरातील सामानाची उचका-पाचक करून घरातून पोबारा केला.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती समजतात राहुरी पोलीस ठाण्याचे (Rahuri Police Station) पो. कॉ. प्रवीण खंडागळे, रोहित पालवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.