मुंबई | Mumbai
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा देणारे मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी एल्गार पुकारला आहे. काल (दि.२७ ऑगस्ट) रोजी त्यांनी अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. आज मनोज जरांगे शिवनेरीवर (Shivneri) दाखल झाले असून, ते मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम आहेत. या आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी जरांगेंना एक दिवसाची परवानगी दिली आहे. तसेच काही अटी शर्ती देखील घातल्या आहेत.
त्यानंतर मनोज जरांगेंनी पोलिसांना (Police) या अटीशर्तींचे पालन करणार असल्याचे सांगत हमीपत्र दिले आहे. या हमीपत्रात त्यांनी आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन होणार नाही, याची खात्री दिली आहे. त्यानंतर आता मनोज जरांगे हे २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानात (Azad Maidan) आमरण उपोषणास बसणार आहेत.
दरम्यान, मनोज जरांगेंना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) पूर्वपरवानगीशिवाय मुंबईत आंदोलन करण्यास मनाई केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला अटीशर्तींसह परवानगी दिली. त्यासाठी आझाद मैदानात सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेची मुभा देण्यात आली आहे. तसेच आझाद मैदानावर फक्त पाच हजार आंदोलकांनाच (Protesters) येता येईल, असेही मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) अटीत म्हटले आहे.
जरांगेंनी हमीपत्रात दिलेली मुख्य आश्वासने
- आंदोलनासाठी मिळालेली परवानगीची मूळ प्रत पोलीस अधिकाऱ्यांना दाखवली जाईल.
- पोलिसांशी नियमित संपर्कासाठी जबाबदार व्यक्तीची नियुक्ती केली जाईल.
- सभास्थळी पिण्याचे पाणी आणि वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातील.
- धरणे आणि निदर्शने सुव्यवस्थित रीतीने होतील, वाहतुकीत अडथळा येणार नाही.
- सहभागी व्यक्तींची संख्या निश्चित मर्यादेत राहील.
- स्वयंसेवक तैनात केले जातील आणि त्यांची यादी पोलिसांना दिली जाईल.
- आंदोलन ठरवलेल्या ठिकाणीच होईल.
- आंदोलन सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेतच होईल.
- ध्वज/फलकाचे आकार आणि काठी निश्चित मर्यादेत राहतील.
- हिंसक किंवा धोकादायक साधने जवळ ठेवली जाणार नाहीत.
- कोणतीही चिथावणीखोर किंवा विभाजन करणारी भाषा वापरली जाणार नाही.
- पोलिसांनी दिलेले सर्व कायदेशीर निदेशांचे पालन केले जाईल.
- सार्वजनिक मालमत्ता किंवा सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला होणार नाही.
- कोणत्याही प्रार्थनास्थळाची किंवा पवित्र वस्तूची हानी होणार नाही.
- निर्दिष्ट ठिकाणावरून बाहेर जाणार नाही.
- कोणतीही कागदपत्रे, प्रतिमा किंवा अन्न जाळले जाणार नाहीत.
- परवानगीशिवाय ध्वनिक्षेपक किंवा जनसंबोधन साधने वापरली जाणार नाहीत.
- कोणतीही वाहने, प्राणी किंवा वाहनसाधने आंदोलनस्थळी आणली जाणार नाहीत.
- आयोजकांनी अनुयायांना नियंत्रणाखाली ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
- हमीपत्रातील नियमांचे पालन पूर्ण केले जाईल आणि पोलिसांना सहकार्य केले जाईल.




