Wednesday, January 7, 2026
Homeमुख्य बातम्याManoj Jarange Protest : आझाद मैदान परिसर रिकामं करा; मुंबई पोलिसांची मनोज...

Manoj Jarange Protest : आझाद मैदान परिसर रिकामं करा; मुंबई पोलिसांची मनोज जरांगेंना नोटीस  

नोटीशीत नेमकं काय म्हटलंय?

मुंबई | Mumbai

मराठा आरक्षणासाठी शुक्रवार (दि.२९) ऑगस्टपासून मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचे आझाद मैदानात (Azad Maidan) आमरण उपोषण सुरु आहे. आज (मंगळवार) त्यांच्या उपोषणाचा पाच दिवस असून, आझाद मैदानात मोठ्या संख्येने राज्यभरातून मराठा आंदोलक (Maratha Protest) दाखल झाले आहेत. या मराठा आंदोलकांनी सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.

- Advertisement -

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर काल (सोमवारी) सुनावणी झाली असता न्यायालयाने मराठा आंदोलकांकडून नियमांचं उल्लंघन होत असल्याचे म्हटले. त्यानंतर पोलिसांनी मनोज जरांगेंना आझाद मैदान खाली करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच रेल्वे प्रशासनाकडूनही मराठा आंदोलकांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मनोज जरांगे यांच्या कोअर कमिटीला आझाद मैदान परिसरात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे.

YouTube video player

दरम्यान, या नोटिशीनंतर मनोज जरांगे यांना आझाद मैदान रिकामे करावे लागणार आहे. पंरतु, पोलिसांच्या नोटिशीनंतरही मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत. आंदोलन करण्यासाठी न्यायालय आणि पोलीस यांनी देण्यात आलेल्या अटी व शर्तीचे उल्लघंन करण्यात आल्याने जरांगे पाटील यांनी मागितलेल्या आंदोलनाच्या परवानग्या नाकारण्यात आली आहे. तसेच पत्रात मनोज जरांगे पाटलांनी प्रसार माध्यमांवर केलेल्या वक्तव्याच्याही पोलिसांनी दखल घेत त्याचा उल्लेखही नोटीसमध्ये केला आहे. तर नोटीस मिळाली नसल्याचा दावा कोअर कमिटीने केला आहे.

नोटीशीमध्ये नेमकं काय म्हटलंय?

आपण दिनांक २९/०८/२०२५ रोजी पासून आझाद मैदान, मुंबई येथे आपले आमरण उपोषण हे आंदोलन सुरू केले असून त्यामध्ये आपल्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातील सुमारे ४०,००० आंदोलकाचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच, सदर आंदोलनाशी संबंधित असलेली सुमारे ११,००० लहान मोठी चार चाकी वाहने मुंबई शहरात आणण्यात आली आहेत. त्यातील सुमारे ५००० वाहने ही दक्षिण मुंबईतील आझाद मैदान, मा. उच्च न्यायालय परिसर, मंत्रालय परिसर, कुलाबा, काळबादेवी, डोंगरी, पायुधनी, वाडीबंदर, इ. परिसरात आणण्यात आली असून त्यातील बहुतेक वाहने हि दक्षिण मुंबईतील महात्मा गांधी मार्ग, दादाभाई नवरोजी मार्ग, महापालिका मार्ग, हजारीमल सोमाणी मार्ग, इ. मुख्य मार्गावर आणि सी.एस.एम. टि. जंक्शन, मेट्रो जंक्शन, ओ.सी.एस. जंक्शन, इ. मुख्य चौकांमध्ये अनाधिकृत रित्या उभी करण्यात आली आहेत. ही वाहने मुख्य मार्गावर व मुख्य चौकांमध्ये वाहतूकीच्या कोणत्याही नियमांचे पालन न करता पार्क करण्यात आली असून त्यामुळे वाहतुकीचा पुर्ण बोजवारा उडालेला आहे. आंदोलकांनी रस्ते व चौकांमध्ये उघड्यावर अन्न शिजवून, अर्धनग्न अवस्थेत स्नान करून, उघड्यावर शौचास बसून व लघुशंका करून, सार्वजनिक स्वास्थास बाधा निर्माण केली आहे. तसेच, त्यांनी सार्वजनिक जागेत असभ्य वर्तन देखील केलेले आहे.

२९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजता आंदोलन स्थगित करणे अपेक्षित होते. पण तसे न करता १ सप्टेंबरपर्यंत ते सुरु ठेवले आहे. आंदोलन सुरु ठेवण्याची परवानगी देण्याचा अर्ज नियमावलीतील विहित नमुन्यात नव्हता. ज्येष्ठ नागरिकांना आंदोलनामध्ये सहभागी करुन नियमांचा भंग केला. मुख्य मार्गावर व चौकात वाहने पार्क करुन वाहतूक कोंडी केली. ५ हजार पेक्षा जास्त आंदोलक आणून नियमाचा भंग केला. आपल्याच आंदोलनाने संपूर्ण परिसर व्यापल्याने परवानगी देता आली नाही. त्यामुळे इतर आंदोलनाला परवानगी देता आली नाही. त्यामुळे आंदोलनाचा हक्क बाधित झाला आहे. आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात सी.एस.एम.टि., चर्चगेट रेल्वे स्थानके, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, हुतात्मा चौक, मेट्रो जंक्शन, ओ.मी. एस. जंक्शन, सी.एस.एम.टि. जंक्शन या ठिकाणी मोर्चे नेवून रास्ता रोको केले, अश्लिल वर्तन केले, सत्यावर क्रिकेट / कबड्डी असे खेळ खेळून सार्वजनिक वाहतूकीस अडथळे आणले. तसेच त्यांनी रस्त्यावरील वाहनांचे टपावर चढून कपडे काढून विक्षिप्त नाचकाम केले व रस्त्यावरील सिग्नल पोल वर चढून नारेबाजी केली.

तसेच, सिटी बममध्ये घुसखोरी करून मुंबईतील नागरीकांशी उद्धट वर्तन करून भांडणे केली. आंदोलकांनी आपल्या आंदोलना दरम्यान नियमबाह्य कामे करून नियमाचा भंग केला. स्वतः आंदोलनासाठी वापरत असलेल्या ध्वनीक्षेपकाची रितसर परवानगी घेतलेली नाही. प्रसार माध्यमांसमोर बोलताना, “त्यांच्या अडमुठेपणामुळे नुसते मुंबईचे बेट जर तुमच्यावर संभाळायची वेळ आली, तर तुमच्या जिंदगीवर थुकावे लागणार. तुम्हाला फक्त मुंबईच बेट संभाळावे लागणार आहे, आजुबाजुचे सगळे नाके मराठ्यांनी व्यापलेले असणार आहे. हे तुम्ही, मी करून आजपर्यंत दाखवलेले आहे. आणि मी जर मेलोच तर बेट सुध्दा नाही तुमचं मग. महाराष्ट्र तर नाही पण बेट सुध्दा तुमचा नाही” असे विघटनवादी वक्तव्य केले आहे. तसेच, आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर, आपण महाराष्ट्रातील ५ करोड पेक्षा अधिक मराठ्यांना मुंबई शहरात आणून मुंबईमध्ये पाय ठेवायला देखील जागा शिल्लक ठेवणार नाही, अशा आशयाची धमकी दिलेली आहे, असं मुंबई पोलिसांनी म्हटलं.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...