मुंबई | Mumbai
मराठा समाजाला आरक्षण (Maratha Community Reservation) मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आंदोलकासह चार दिवसांपूर्वी (दि. २९ ऑगस्ट) मुंबईत (Mumbai) दाखल झाले. त्यामुळे मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून, प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायलयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एमी फाउंडेशनने ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत (Petition) आंदोलन बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. तसेच मुंबईकर आणि सर्वसामान्यांना आंदोलनाचा त्रास का? असा सवालही करण्यात आला आहे. त्यावर आता न्यायमूर्ती रविंद्र घुगे आणि गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर थोड्याच वेळात म्हणजेच १.३० वाजता तातडीची सुनावणी होणार आहे.
दरम्यान, आज (सोमवारी) मुंबई उच्च न्यायालयाला (Mumbai High Court) सुट्टी असताना देखील सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाकडून मान्यता देण्यात आली आहे. ९ ऑगस्ट रोजी यावर सुनावणी होणार होती. मात्र, मुंबईची परिस्थिती बघता तातडीची सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे.




