मुंबई | Mumbai
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांचे आमरण उपोषण सुरु आहे. आज (रविवारी) त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून, लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. हे आंदोलक सरकारकडून निर्णयाची प्रतीक्षा करत असून, सरकारची चांगलीच कोंडी झाल्याचे बघायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने मराठा आरक्षणासाठी स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकांचा सपाटा सुरू असून, आज पुन्हा एकदा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील (Radha Krishna Vikhe Patil) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याबाबतची माहिती विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.
यावेळी विखे पाटील म्हणाले की, “माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे (Sandeep Shinde) आणि उपसमितीमधील सदस्यांनी काल मनोज जरांगे यांची भेट घेतली. शासनाकडून जी कार्यवाही सुरु आहे त्याची कल्पना त्यांना दिली. यावेळी त्यांच्याही मुद्द्यांसदर्भात चर्चा झाली. हैदराबाद आणि सातारा गॅझेटियरची अंमलबाजावणी झाली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, आम्ही या गोष्टी तपासून घेत आहोत”, असे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, “राज्याच्या महाधिवक्त्यांसोबत आज संध्याकाळी ५ वाजता बैठक होणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत चर्चा होईल. तसेच जो कायदेशीर गुंता झाला आहे, त्यासाठी काही पर्याय आहे का यावर बोलून मार्ग काढला जाईल. त्यानंतर आम्ही अंतिम प्रस्ताव मनोज जरांगे यांना पाठवू,” असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी घटनेत बदल करून आरक्षणाची मर्यादा वाढवणे, हाच मराठा आरक्षणासाठी पर्याय आहे, अशी भूमिका काल मांडली होती. या भूमिकेवरून राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, ” मला शरद पवारांचं आश्चर्य वाटतं. ते चार वेळ राज्याचे मुख्यमंत्री होते. तसेच केंद्रातही मंत्री (Minister) होते. त्यांच्या काळात ओबीसी आरक्षण लागू झाल्यानंतर त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश करावा, असे त्यांना का वाटले नाही? या मुद्द्यावरून राजकारणाची पोळी भाजण्याचा प्रयत्न पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने करू नये,” असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले.




