Friday, May 3, 2024
Homeब्लॉगआनंद पेराल तर गुणवत्ता साधाल

आनंद पेराल तर गुणवत्ता साधाल

बालकांचा संपादन स्तर उंचावत नाही म्हणून त्याला शिकवणी लावली जाते.मैदानाशी असलेले नाते तोडले जाते.मनोरंजनाचे केंद्रे थांबविली जातात.अनेकदा व्यक्तिमत्व विकासाला हातभार लावणा-या वाटा बंद करायच्या आणि त्याला हवे ते आणून द्यायचे. मात्र तरी सुध्दा विद्यार्थ्यांचा अपेक्षित संपादन स्तर उंचावताना दिसत नाही. गुणवत्ता उंचावण्यासाठी केवळ शैक्षणिक उपाययोजना महत्वाच्या नाहीत. तर त्या पलिकडे जाऊन गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. शिकणे होण्यासाठी घरच्या वातावरणाचा सर्वाधिक परीणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती होत असतो हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे शाळा कितीही चांगली असली तरी घरातील वातावरण चांगले असायला हवे असते.उत्तम शिक्षणासाठी उत्तम वातावरणाची निर्मिती महत्वाची हे लक्षात घ्यायला हवे.

शाळेत रोहित नेहमी यायचा.तसा तो एका सुशिक्षित घरातून शाळेत येत होता. वर्गात अत्यंत हुशार असलेला आणि अभ्यासात प्राविण्य प्राप्त केलेल्या रोहितचा अभ्यास गेले काही दिवस सतत अपूर्ण असायचा.तिसरीत त्यांने अत्यंत चांगला अभ्यास करून मार्क मिळविले होते.अशा परीस्थितीत चौथीच्या वर्गात त्याचा संपादन स्तर मात्र खालावत चालला होता. अचानक असे काय घडले , की त्याच्या मार्कात मोठया प्रमाणावर घट झाली. त्याची ढासळत चाललेली गुणवत्तेने शिक्षकही चिंतेत होते.विद्यार्थी तोच होता, शिक्षकही तेच होते. अभ्यासक्रमातही फार मोठा फरक नव्हता.मात्र विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा स्तर खालावत चालला होता. अनेकदा शिक्षकांनी प्रेमाने समजावून सांगितले, रागावून पाहिले. तरीसुध्दा फार मोठा फरक पडताना दिसत नव्हता. अखेर एक दिवस त्याला अत्यंत प्रेमाने विश्वासात घेत शिक्षकांनी परीस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तरी तो आरंभी बोलत नव्हता.

- Advertisement -

शिक्षकांनी त्याक्षणी त्याला न रागवता सोडून दिले.खरंतर गेले काही दिवस तो वर्गात आणि बाहेरील परीसरातही अबोल बनला होता. शिक्षक त्याला पुन्हा पुन्हा जवळ घेत विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करीत होते. शिक्षक आणि रोहित यांच्या नात्यात विश्वास संपादन झाला आहे असे त्याला वाटल्यावरच शिक्षकांसोबत अधिक मुक्तपणे संवाद साधू लागला. एके दिवशी तो म्हणाला सर, माझे यावर्षीचे मार्क कमी झाले आहेत. तुम्ही रागावलात पण मी तुम्हाला काहीच सांगितले नाही. माझे मन अभ्यासात लागत नाही.वाचले तरी लक्षात राहत नाही. गणिते सोडवली तर सुटत नाही. सूत्र आणि कविता पाठ होत नाही. अभ्यासात लक्ष लागत नाही. मी खूप प्रयत्न करतो पहिल्या साऱखे मार्क मिळवायचे; पण नाही मिळत सर..अरे पण असे का होते ? सर मला नाही सांगता येणार. पण अलिकडे बाबा रोज दारू पिऊन येतात. आल्यानंतर ते रोज आईच्या सोबत भांडतात. कधीकधी आईला मारतात.

घरात आईने स्वयंपाक केलेला असेल तर तो फेकून देतात.आई उपाशी झोपते. ती रडते ना तेव्हा मला खूप वाईट वाटते.मला सतत तिच्या डोळ्यातील रडणे आठवते..तीला मारताना ती जे ओऱडते तो आवाज पुन्हा पुन्हा ऐकू येतो.मला खूप भिती वाटते बाबांची..मी मध्ये पडलो की बाबा मलाही मारतात.खरेतर तो अत्यंत मोकळेपणाने सांगत होता.आता ख-या अर्थाने त्याच्या हरवलेल्या गुणवत्तेचे कारण सापडले होते.पण त्या परीस्थितीला रोहित जबाबदार नव्हता.त्याची गुणवत्ता ढासळत होती.खरेतर रोहित नियमित शाळेत येत होता.शिक्षक शिकवत होते.पुस्तके हाती होती.सारे काही पूर्वीप्रमाणे होते , फक्त नव्हती ती फक्त घरची परीस्थिती.आता काय करणार ? हा प्रश्न शिक्षकांच्या समोर होता.शिक्षक शक्य होईल ते सारे काही करू पाहात होते.त्याला हवी ती मदत करीत होते.

शिकण्याबरोबर त्याच्या मानसिक स्थिती स्थिर राहवी म्हणून प्रयत्न करीत होते.त्यातून रोहित काही प्रमाणात सावरत होता ; पण तरी सुध्दा जेवढी परीस्थितीत पूर्वी जेवढी चांगली होती तेवढी सुधारणा मात्र होताना दिसत नव्हती.अशावेळी शिक्षक फक्त त्याच्यात बदल घडवून यावेत म्हणून प्रयत्नशील राहिले.अखेर व्हायचे तेच झाले.चौथीच्या वर्गात त्याची श्रेणी अत्यंत खालावली.त्याची ही घसरलेली श्रेणी पालकांच्या डोळ्यात अंजन घालणारी होती.मुलाचे प्रगती पुस्तक पाहून आईच्या डोळ्यात पाणी तरारले होते. तिच्या मनात काहीशी भितीही पैदा झाली होती. मात्र बाबांनी नेहमी प्रमाणे मुलाच्या कमी मार्क मिळविण्याला शाळा,शिक्षकांना जबाबदार धरले.त्याच बरोबर रोहित अभ्यास करीत नसल्याने हे घडले असे ते ओरडून सांगत होते.कमी मार्काला त्याला जबाबदार धरून रोहितला मारहाण केली जात होती .त्याच्या अंगावर चांगले वळ उमटले होते.आता त्याच्यावरती या वर्तनाचा अधिक परीणाम होऊ लागला होता.त्याची श्रेणी घसरल्याने बाबांचा संताप सतत अनुभवत होता.त्याच्यात आणखी भितीने घर केले होते.

पुढच्या वर्गात गेलेला रोहित पहिले आठवडाभर शाळेत आलाच नाही.मग शिक्षकच घरी गेले आणि त्यांनी त्याच्या न येण्याबाबतचे कारण पालकांना विचारले.तर पालक म्हणाले काय दिवा लावणार आहे शाळेत जाऊन ? किती कमी गुण मिळाले.शाळेत काही शिकविता का नाही ? असा उलट सवाल केला.शिक्षक काहीच बोलले नाही.केवळ रोहितला शाळेत पाठविण्याचे आवाहन केले.त्याला जवळ बोलावत यात तुझी काही चूक नाही.तू घाबरू नकोस..होईल पुन्हा पूर्वीसारखे.तू नियमित शाळेत ये. असे सांगत शिक्षक निघून गेले.तो दुस-या दिवशी शाळेत आला.त्यानंतर पुढील आठवडयात शाळेने पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

त्याच मेळाव्यात पालकांचे प्रबोधन होण्याकरीता एका बालमानस शास्त्राची जाण असलेल्या डॉक्टरांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.त्या दिवशी सर्व पालकांनी सक्तीने उपस्थित राहवे असे सांगितले होते.त्या मेळाव्याला रोहितच्या पालकांनी यावे म्हणून शिक्षकांनी प्रयत्न केले. पालक मेळाव्यात मुलांची गुणवत्ता आणि घरचे वातावरण या संबंधीने डॉक्टरांनी अत्यंत सुंदर विवेचन केले.शाळा म्हणजे गुणवत्तेचे पीक लावणारी व्यवस्था नाही.त्या पलिकडे घरचे वातावरण चांगले असेल तरच तुमचे भविष्य असलेली पाल्य घडतील. अन्यथा त्यांचा प्रवास जसा अडखळत होईल त्याप्रमाणे तुमच्या पाल्यांचे भविष्य देखील अंधाराच्या खाईत लोटले जाईल.उद्या काही सुधारण्यापेक्षा आज पालकांनी सुधारण्याची गरज नाही. तुम्ही तुमचे भविष्य घडवत आहात ,त्यामुळे घरातील वातावरण किती महत्वाचे आहे हे लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला.

व्याख्यान संपले होते.अनेक पालकांनी प्रश्न विचारले..पण रोहितच्या बाबांची मात्र इच्छा झाली नाही.त्यांना आपले काय चुकते आहे हे लक्षात येऊ लागले होते..त्यांचे पाय स्थिरावले होते..आणि भविष्याचा परिणाम रोहितच्या निमित्ताने त्यांच्या डोळ्यासमोर दिसू लागला होता.पालक सर्व निघून गेली..मात्र रोहितचे पालक शाळेच्या आवारातच थांबले होती.त्यांनी वर्ग शिक्षकांना भेटून रोहितच्या सध्याच्या प्रगतीची विचारपूस केली.शिक्षकांना संधी होती.त्यांनी गत दोन वर्षातील त्याची गुणवत्ता व सध्या खालावलेली गुणवत्ता यांचा आलेख डोळ्यासमोर ठेवला होता.का खालावत आहे गुणवत्ता हेही शिक्षकांनी लक्षात आणून दिले.तुमच्या घरातील दारू पिणे आणि संघर्ष यांचा तो परीणाम आहे. त्याच्या मनात भितीचे घर आहे असे बरेच काही सांगितले. खरेतर त्यांचे डोळे उघडले होते.घरातील वातावरण नसल्याने रोहितचे पाऊल मागे पडत होते.सर्व परीस्थिती लक्षात घेऊन रोहितच्या पालकांनी आजपासून मदय सोडण्याचा निर्णय घेतला होता.

मद्यामुळे आपली भांडणे होतात आणि त्याचा परीणाम मुलांच्या शिक्षणावर होत असेल तर आपले भविष्य आपण खराब करीत आहोत ही जाणीव झाली.त्या दिवशी त्यांनी शिक्षकांसमोर शपथ घेतली..आणि पुन्हा परिवर्तनाची वाट चालू लागले.घरातील वातावरण पुन्हा फुलले..बहरले…आनंद निर्माण झाला.मुलाच्या शिक्षणातही हळूहळू प्रगती होताना दिसू लागली.त्याचा थांबलेला संवाद पुन्हा मित्रांसोबत सुरू झाला.आता घरातील आनंद घेऊनच तो शाळेत येत होता. आनंद असल्याने मन प्रसन्न होते. शिकण्यासाठी मन, चित्त जितके प्रसन्न असेल तितके शिकणे आणि आकलन समृध्द होते. त्यामुळे केवळ शाळा आणि पुस्तकांवरती पालकांनी अवलंबून न राहाता आनंदी वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. मुलांना शिकवणी देखील नको..त्यांच्या कोणत्याही वाटा बंद न करता आपण चालत राहयला हवे. आनंदी वातावरण हे सृजनशीलतेसाठी पोषक असते.त्यातून मुलांची प्रगतीची भरारी निश्चित आशादायी ठरेल.

शिकण्यासाठी मुलांना साधने नको.मुलं स्वतःहून शिकतात.त्यांना शिकविण्याची गरज नाही.मग शिकणे म्हणजे तरी काय असते ? शिकणे म्हणजे शिकण्यासाठीचे वातावरण निर्माण करणे असते.त्यामुळे घर जितके आनंदी तितके प्रसन्न ठेवले जाईल तितकी गुणवत्ता उंचावणार आहे.त्यामुळे शिक्षण हक्क कायद्याने मुलांना शारीरिक व मानसिक शिक्षा करण्यास प्रतिबंध केला आहे.शिक्षा नाही म्हणजे भिती नाही.भिती नाही म्हणजे आनंद आणि आनंद म्हणजे केवळ सृजनशीलतेच्या वाटा…त्यामुळे गिजूभाई म्हणाले होते की पालकांमधील भांडणे घरात विष पसरवते. मुलांना त्याचा भयानक त्रास होतो. मुलांसाठी, मोठ्यांनी शांततेने रहायला शिकले पाहिजे. घरातील आनंद हा शिक्षणाचा मुख्य स्त्रोत आहे.

– संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

.

- Advertisment -

ताज्या बातम्या