Friday, May 3, 2024
Homeब्लॉगई-मराठीचे संवर्धन

ई-मराठीचे संवर्धन

मराठीसह विविध प्रादेशिक भाषांच्या अस्तित्वाबद्दल सतत चिंता व्यक्त केली जाते. मात्र भारतात इंटरनेटच्या वापरात सर्वाधिक

दबदबा प्रादेशिक भाषांनी निर्माण केला आहे. त्यातही मराठी, बंगाली आणि तेलगू या भाषा आघाडीवर आहेत. असे नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात समोर आले आहे. भारतात सर्वाधिक बोलली आणि लिहिली जाणारी भाषा हिंदी असली, तरी इंटनेटच्या वापरात मराठी, बंगाली आणि तेलगू या भाषांचा वापर करणारे अधिक आहेत. गुगलच्या एका अहवालानुसार देशात 50 कोटी इंटरनेट वापरकर्ते आहेत. अँड्रॉईड मोबाईला वापरणार्‍या एकूण वापरकर्त्यांपैकी 73 टक्के वापरकर्ते स्थानिक भाषेतून ऑनलाईन डेटा शोध करतात हे समोर आले आहे.

- Advertisement -

मराठी आणि बंगाली भाषकांकडून डिजिटल प्लॅटफॉर्मचा सर्वाधिक वापर करण्यात येतो. इंटरनेटवरील माहितीचा सर्वाधिक उपयोग या वापरकर्त्यांकडून प्रादेशिक भाषेतून केला जातो. प्रादेशिक भाषांत इंटरनेट वापरण्यामध्ये देशातल्या शहरी भागाच्या तुलनेत (66 टक्के) ग्रामीण भागाने आघाडी घेतली (76 टक्के) आहे. प्रादेशिक भाषांमध्ये इंटरनेटचा वापर करणार्‍यांची संख्या वर्षाला 18 टक्क्यांनी वाढत आहे. अशा आशादायक परिस्थितीत मराठी भाषक आणि महाराष्ट्र शासन यांची जबाबदारी निश्चितच वाढते.

या मंत्रालयाला भाषा व साहित्य संवर्धनात खरोखरच योगदान द्यायचे असेल तर ई-मराठी संदर्भात मराठीचे अभ्यासक आणि संगणक क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने निश्चित असे प्रकल्प आखणे महत्वाचे ठरणार आहे. ई-मराठी संवर्धन महामंडळाची स्थापना केल्यास आणि या मंडळाला सत्ता आणि साहित्य अशा दोन्हीही स्वरूपाच्या राजकारणापासून अलिप्त ठेवल्यास या क्षेत्रात महत्वाचे कार्य होऊ शकेल.

अशा मंडळाला भरघोस आर्थिक पाठबळ व सुविधा उपलब्ध करून देत ई-मराठी विषयी अंतरिक तळमळ असनार्‍या व्यक्तीचींच प्रामाणिक व पारदर्शक निवड या मंडळावर करण्यात यावी. अखिल मराठी भाषक समाजाला या ध्येयाने प्रेरित केल्यास शासन व समाज या दोन्ही अंगाने ई-मराठीची चळवळ प्रभावी होऊ शकेल आणि मराठी साहित्य व भाषा यांच्या उज्ज्वल भविष्याचा राजमार्ग खुला होऊ शकेल.

विकिपिडीयाच्या ज्ञानकोशात भर घालण्याची संधी व स्वातंत्र जगातील प्रत्येक व्यक्तीला दिलेले आहे. मराठी भाषा व साहित्य यांचा व्यासंग असलेल्या व्यक्तींना साधन-सुविधा व तांत्रिक सहकार्य उपलब्ध झाल्यास या प्रकल्पात त्यांचे मौलिक योगदान मिळू शकेल. प्रत्येक व्यक्तीकडे नवसाहित्य निर्मितीची प्रतिभा असू शकत नाही, हे वास्तव मान्य करूनही आपण दर्जेदार व अभिजात मराठी साहित्य इंटरनेटरवर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मात्र नक्कीच पार पाडू शकतो. कारण साहित्याची नवनिर्मिती जेवढी महत्वाची आहे, तेवढीच या साहित्याच्या जतनाची व प्रचार-प्रसाराची जबाबदारी देखील महत्वाची आहे. इंटरनेटच्या माध्यमातून अभिजात मराठी चित्रपट आणि नाटक मोफत उपलब्ध करून देणारे संकेतस्थळ निर्माण केल्यास मराठी भाषा व साहित्य यांच्या संवर्धनास निश्चितच हातभार लागू शकतो. दर्जेदार मराठी ब्लॉगची निर्मिती करून मराठी भाषक समाज वैचारिक आदान-प्रदान करू शकतो. आज मयुनीकोडफ मध्ये संगणकावर आणि भ्रमणध्वनीवर मराठी समवेत अनेक भारतीय भाषा टंकलेखीत करण्याची सोय झाली आहे.

असे असले तरी युनीकोड हे माध्यम वापरण्यास तितकेसे सोयीचे वाटत नाही. युनीकोडचा वापर करतांना प्रथम इंग्रजी भाषेत मराठी शब्दाचे स्पेलिंग तयार करावे लागते. याप्रकारात अनेक अडचणी पहावयास मिळतात. अनेकांना मराठी शब्दाचे इंग्रजीत नेमके स्पेलिंग तयार करण्याची अडचण निर्माण होते. तसेच अनेक मराठी शब्द असे असतात की त्यांना युनीकोडमध्ये नेमकेपणाने निर्माण करता येत नाही. मराठी फॉन्टमध्ये टंकलेखन करुन ते युनिकोडमध्ये परावर्तीत करणारे काही सॉफ्टवेअऱ उपलब्ध आहेत. त्यांच्या वापरातही अनेक अडचणी आहेत. युनीकोड मध्ये टंकलिखित केलेला मजकूर ग्रंथनिर्मितीसाठी जे दर्जेदार सॉफ्टवेअऱ आहेत, त्यांच्यासाठी उपयुक्त ठरत नाही. त्यातल्या त्यात भ्रमणध्वनीवर उच्चारण करून मराठी मजकूर टंकलेखित करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. त्यातही काही अडचणी आहेतच. महाराष्ट्र शासनाने भाषा संवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना केली आहे. मराठी विश्वकोश अपच्या रूपात आज उपलब्ध करण्यात आले आहे.

तरी हे अप अद्याप परिपूर्ण आहे असे म्हणता येत नाही. उपरोक्त सर्व कल्पना वास्तवात येण्यासाठी मराठीच्या अध्यापकांनी जागरूक होऊन संगणक व इंटरनेट या क्षेत्राविषयी असलेल्या विन्मुख वृत्तीचा त्याग करून या माध्यमांशी सन्मुख होत मराठी भाषा व साहित्य व्यवहाराचा प्रभावी आविष्कार केल्यास या माध्यमांचा भाषा व साहित्य संवर्धनासाठी निश्चितच उपयोग होईल. संगणकाच्या क्षेत्रात संपूर्ण जगात मराठी युवापिढीने दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. बिल गेटस् यांच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या माध्यमातून आलेल्या संगणकक्रांतीत मराठी युवापिढीचे अत्यंत महत्वाचे योगदान आहे. परंतु मराठी भाषेला व साहित्याला आपल्या या युवापिढीचा सकारात्मक उपयोग करून घेता आलेला नाही. विजय भटकरांसारख्या मराठी संशोधकाने भारतासाठी परमसंगणकाची निर्मिती केली असली तरी, संगणकाच्या क्षेत्रात प्रमाण व निश्चित अशा मराठी सॉफ्टवेअऱची निर्मिती आपण करू शकलेलो नाही. मराठी भाषेचे संगणकावर टंकलेखन करतांना ही अडचण आपल्याला महाराष्ट्रातच विविध संगणकानुसार वेगवेगळ्या स्वरूपात आढळते.

एका संगणकावर एखादा मजकूर टंकलिखीत केल्यास तो दुसर्‍या संगणकावर पाहता येत नाही किंवा त्याच्यावर काम करता येत नाही. हे आपण नेहमी अनुभवतो. सध्या संगणक क्षेत्रात मराठीचा वापर करताना मराठी प्रतिशब्द माहित नाहीत म्हणून इंग्रजी शब्द मराठीत लिहून वेळ मारून नेली जाते. असे ही पाहण्यात येते. यावरून आपल्याला संगणक व इंटरनेट संदर्भात मराठीसाठी खूप काही करता येणे आहे. संगणक क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवापिढीला मराठी भाषा व साहित्य यांच्या संवर्धनाची आवश्यकता जाणवून देण्यात किंवा स्वभाषेविषयी या पिढीची अस्मिता जागरूक करण्यात आपण अपयशी ठरलो आहोत, हे मान्य करावे लागते.

आजच्या जगातील या माध्यमांचा सुयोग्य वापर केल्यास जगाच्या विविध भागात वास्तव्यास असलेल्या मराठी भाषकांच्या युवापिढीला स्वभाषा आणि त्यातील दर्जेदार व अभिजात साहित्याचा परिचय करुन देता येणे शक्य होईल. इतर भाषक समाजापर्यंत मराठी साहित्य पोहोचणे जितके गरजेचे आहे,त्याहीपेक्षा सर्वप्रथम जगाच्या पाठीवर असलेल्या प्रत्येक मराठी भाषकापर्यत ते पोहोचणे अधिक महत्वाचे आहे. अशा प्रयत्नातून मराठी भाषा व साहित्य यांच्या संवर्धनासोबतच मराठी साहित्याच्या विद्यार्थ्याला देखील स्वयंरोजगाराच्या विविध संधी प्राप्त होऊ शकतील.

प्रा.डॉ.राहुल हांडे । 8308155086

- Advertisment -

ताज्या बातम्या