मुंबई । Mumbai
“ज्या राज्यात व्यवसाय, त्या राज्याचीच भाषा…” हा मंत्र आता महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी व्यवसायासाठी शिरसावंद्य ठरणार आहे. राज्यातील लाखो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे बंधनकारक करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी नेमकी कधीपासून होणार, याचे उत्तर आज (मंगळवारी) मिळण्याची शक्यता आहे. या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एक अतिशय महत्त्वाची बैठक पार पडणार असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या बैठकीच्या निर्णयाकडे लागले आहे.
मराठी भाषेच्या सक्तीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला परिवहन विभागाचे सुमारे ५९ वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. १ मे या महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर ही सक्ती लागू करायची की चालकांना भाषा शिकण्यासाठी आणखी काही अवधी देऊन मुदतवाढ द्यायची, यावर आज अधिकृत शिक्कामोर्तब होईल. या बैठकीनंतर राज्य सरकारकडून नवी नियमावली आणि अटी जाहीर केल्या जाण्याची दाट शक्यता आहे.
सोमवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विविध रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींशी मॅरेथॉन चर्चा केली. या बैठकीला माजी खासदार संजय निरुपम, कामगार नेते शशांक राव आणि हाजी अराफत शेख यांसारखे दिग्गज नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे, ‘महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी बोलता येणे अनिवार्य आहे’ या मुद्द्यावर सर्व संघटनांनी एकमताने सहमती दर्शवली आहे. मात्र, मुंबई आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर अमराठी चालक असल्याने, त्यांना ही भाषा आत्मसात करण्यासाठी काही सवलत किंवा अवधी मिळावा, अशी मागणी संघटनांनी लावून धरली आहे.
चालकांच्या मागणीवर भाष्य करताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “चालकांना मराठी शिकण्यासाठी अधिक वेळ हवा आहे, त्यासंदर्भात सरकार सकारात्मक आहे. मराठी भाषेचा आदर राखणे आणि प्रवाशांशी संवाद साधणे सोपे जावे हाच यामागचा उद्देश आहे. मात्र, अंमलबजावणीची तारीख आणि अटींबाबतचा अंतिम निर्णय मंगळवारच्या बैठकीतच घेतला जाईल.”
परिवहन विभागाच्या या निर्णयामुळे आता राज्यातील टॅक्सी आणि रिक्षा व्यवसायात मराठीचा दबदबा निर्माण होणार आहे. मात्र, नवीन परवाना मिळवण्यासाठी किंवा जुन्या परवान्याच्या नूतनीकरणासाठी मराठी भाषेची तोंडी परीक्षा घेतली जाणार का? तसेच, ज्यांना मराठी येत नाही त्यांच्यावर काय कारवाई होणार? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत. एकूणच, आजच्या बैठकीनंतर मुंबईसह महाराष्ट्रातील रिक्षा-टॅक्सी व्यवसायाला एक नवी दिशा मिळणार असून, ‘मराठी सक्ती’चा हा निर्णय मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एक मोठे पाऊल ठरणार आहे.





