
नवी दिल्ली | वृत्तसंस्था New Delhi
स्वातंत्र्य दिन २०२६ च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने पोलीस, अग्निशमन दल, होमगार्ड व नागरी संरक्षण तसेच सुधारात्मक सेवांमधील एकूण १,०५७ अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर केली आहेत. ही घोषणा आज, १४ ऑगस्ट रोजी करण्यात आली.
यामध्ये ३०१ शौर्य पदके, ९२ राष्ट्रपती पोलीस पदके (विशिष्ट सेवेसाठी) आणि ६६४ गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदके यांचा समावेश आहे.
३०१ शौर्य पदकांपैकी २७२ पदके पोलीस दलातील तर २९ पदके अग्निशमन दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहेत. जीवित व मालमत्तेचे रक्षण करणे, गुन्हे रोखणे तसेच गुन्हेगारांना पकडताना दाखविलेल्या उल्लेखनीय शौर्यासाठी ही पदके प्रदान करण्यात आली आहेत.
शौर्य पदकांमध्ये डाव्या विचारसरणीच्या उग्रवादग्रस्त भागातील १९७, जम्मू-काश्मीरमधील ५१, ईशान्य भारतातील १२ आणि इतर भागांतील ४१ जवान व अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
विशिष्ट सेवेसाठी जाहीर झालेल्या ९२ राष्ट्रपती पदकांमध्ये पोलीस दलातील ८३, अग्निशमन दलातील ४, नागरी संरक्षण व होमगार्डमधील ३ आणि सुधारात्मक सेवांमधील २ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठीच्या ६६४ पदकांमध्ये पोलीस दलातील ६०६, अग्निशमन दलातील २८, नागरी संरक्षण व होमगार्डमधील १८ आणि सुधारात्मक सेवांमधील १२ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
देशाच्या सुरक्षेसह नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या रक्षणासाठी बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत ही पदके जाहीर करण्यात आली आहेत.




