लोणी |वार्ताहर| Loni
लोणी (ता. राहाता) येथे 22 वर्षीय विवाहित साक्षी रोहित कुर्हे या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
सासरच्या मंडळींकडून घरासाठी पैसे तसेच गॅरेज सुरू करण्यासाठी तीन लाख रुपयांची मागणी करण्यात येत होती. पैसे न दिल्याने शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ केल्याचा आरोप मयताच्या कुटुंबीयांनी केला. या छळाला कंटाळून तरुणीने आत्महत्या केल्याची तक्रार लोणी पोलीस ठाण्यात दाखल केली.
साक्षी रोहित कुर्हे (वय 22, रा. लोणी, ता. राहाता) असे आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणीचे नाव आहे.
याप्रकरणी तिचे वडील गोरख पोपट आजगे (रा.शिंगणापूर ता.कोपरगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सासू नंदा शरद कुर्हे, सासरा शरद दत्तात्रय कुर्हे, पती रोहित शरद कुर्हे, नणंद वैष्णवी उर्फ ललिता शरद कुर्हे, तृप्ती तुषार माघाडे यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्र.577/2026 भादंवि कलम 108, 85, 115(2), 351(2) आणि 352 अन्वये लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादीनुसार, साक्षी ही विवाहानंतर लोणी येथे सासरी राहत होती. सासरच्या मंडळींकडून घर खर्चासाठी अनेक दिवसंपासून पैशांची तसेच गॅरेज सुरू करण्यासाठी तीन लाख रुपयांची मागणी करण्यात येत होती. या पैशांसाठी वारंवार तगादा लावण्यात येत होता. पैसे देण्यास विलंब झाल्याने तिला शिवीगाळ, टोमणे मारणे तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास दिला जात होता अशी माहिती मयत साक्षीच्या कुटुंबीयांनी सांगितली. या छळाला कंटाळून साक्षी हिने 17 नोव्हेंबर 2026 रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी लोणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सदर घटनेचा पुढील तपास. सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब सांगळे हे करत आहेत.




