अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
विवाहितेचा छळ करणार्या पतीसह सासरच्या सहा जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहितेने याप्रकरणी शनिवारी (22 फेब्रुवारी) फिर्याद दिली आहे. पती सचिन वसंत शेळके, सासू अनिता वसंत शेळके, सासरे वसंत विश्वनाथ शेळके, दीर बाजीराव वसंत शेळके, नणंद सविता गणेश कोल्हे आणि तिचा पती गणेश कोल्हे (सर्व रा. खारेखर्जुने, ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. संशयित आरोपींनी फिर्यादीचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. पतीकडून सतत हुंड्यासाठी त्रास दिला जात, असा आरोप करण्यात आला आहे.
14 जुलै 2020 ते 15 नोव्हेंबर 2020 या कालावधीत सासरच्या मंडळींकडून फिर्यादीचा छळ करण्यात आला. पती सचिन याने तिला सतत 50 लाख रुपये माहेरहून आणण्यास सांगितले. त्यासाठी वेळोवेळी शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. शिवाय, सासू अनिता शेळके, सासरे वसंत शेळके, दीर बाजीराव शेळके, नणंद सविता कोल्हे आणि तिचा पती गणेश कोल्हे यांनीही मानसिक त्रास दिला.
पीडितेला उपाशी ठेऊन घरातून हाकलून देण्याचा प्रयत्न झाला. शिवाय, पती व कुटुंबियांनी जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर विवाहितेने कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली. कोतवाली पोलिसांनी फिर्यादीनुसार भादंवि कलम 498 (अ), 323, 504, 506 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. महिला पोलीस अंमलदार निता अडसरे अधिक तपास करत आहेत.