अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
फ्लॅट घेण्यासाठी माहेरून 10 लाख रूपये आणण्यासाठी विवाहितेचा सासरी छळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सावेडी उपनगरात राहणार्या पीडित विवाहितेने याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती किशोर किसन फडतरे, सासरे किसन मारूती फडतरे, सासू विजया किसन फडतरे, दीर किरण किसन फडतरे (सर्व रा. चाकाटी, ता. इंदापुर, जि. पुणे), विद्या भापकर (पूर्ण नाव नाही, रा. सोमेश्वर, ता. बारामती, जि. पुणे), अनिता पिसाळ (पूर्ण नाव नाही, रा. शिरपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) व विनिता पंकज शिंदे (रा. मोराळे, जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
ऑगस्ट 2022 मध्ये फिर्यादीचा विवाह किशोर फडतरे सोबत झाला होता. विवाहानंतर फिर्यादीला सासरच्यांनी काही दिवस व्यवस्थित नांदविले. डिसेंबर 2022 ते 30 जून 2024 दरम्यान फिर्यादी सासरी नांदत असताना पती किशोरसह सात जणांनी त्यांना वारंवार शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तु माहेरून फ्लॅट घेण्यासाठी 10 लाख रुपये घेऊन ये असे म्हणून धमकावून क्रुरतेची वागणूक दिली. वारंवार पैशांची मागणी करून मानसिक, आर्थिक व शारिरीक छळ करून अपमानास्पद वागणूक देवून घराबाहेर हाकलून दिले व सासरी नांदण्यास नकार दिला. पीडिताने भरोसा सेलकडे तक्रार दाखल केली होती. तेथे समेट न झाल्याने त्यांनी दिलेल्या पत्रानंतर सोमवारी (9 डिसेंबर) तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.