Sunday, October 18, 2026
HomeनगरAhilyanagar : मॅटने कबाडी यांची याचिका फेटाळली

Ahilyanagar : मॅटने कबाडी यांची याचिका फेटाळली

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पोलीस कोठडीतील मुद्देमाल कक्षातून कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ चोरीला गेल्याच्या प्रकारानंतर, नगर स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची करण्यात आलेली मुदतपूर्व बदली योग्य असल्याचा निकाल महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.

- Advertisement -

पोलीस निरीक्षक कबाडी यांनी 11 जून 2026 रोजीच्या त्यांच्या बदली आदेशाला मॅटमध्ये आव्हान दिले होते. एलसीबीमधून शिर्डी येथील साई मंदिर सुरक्षा विभागात झालेली आपली बदली महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम 22 एनचे उल्लंघन करणारी असून, कोणतीही पूर्वचौकशी न करता ती आकसाने करण्यात आल्याचा दावा कबाडी यांनी केला होता. तसेच, आपल्या जागी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांची बेकायदेशीर सोय करण्यासाठीच हा निर्णय घाईघाईत घेतल्याचा आक्षेप त्यांनी याचिकेत नोंदवला होता. यावर सुनावणीदरम्यान शासनाने आणि पोलीस अधीक्षकांनी न्यायाधिकरणासमोर वस्तुस्थिती मांडली.

कबाडी यांच्या नियंत्रणाखालील मुद्देमाल कक्षातून त्यांच्याच पोलीस हेड कॉन्स्टेबलने 3 कोटींहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ चोरल्याचे उघडकीस आले होते. अधिकार्‍याच्या या अक्षम्य निष्काळजीपणाचे तीव्र पडसाद थेट विधानसभेतही उमटले होते. या प्रकरणाची दखल घेत प्रशासनाने कबाडी यांच्यावर 18 जून 2026 रोजी रीतसर विभागीय चौकशी सुरू केली असून, बदली आदेशानंतरही ते नव्या जागी रुजू न झाल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे व प्रशासकीय शिस्तीचे उल्लंघन केल्याचे शासनाने निदर्शनास आणून दिले.

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि कागदपत्रांचे परीक्षण केल्यानंतर न्यायाधिकरणाने निकाल दिला. पोलीस दलासारख्या शिस्तबद्ध यंत्रणेत अशी मोठी चोरी होणे आणि त्यावर विधिमंडळात प्रश्न उपस्थित होणे ही गंभीर बाब आहे. अशा परिस्थितीत निःपक्षपाती तपासासाठी आणि जनतेचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी संबंधित अधिकार्‍याची तातडीने बदली करणे हा प्रशासनाचा विशेषाधिकार आहे. कबाडी यांनी केलेले वैयक्तिक आकसाचे आणि संगनमताबद्दलचे आरोप पुराव्याअभावी फेटाळून लावत, न्यायाधिकरणाने कबाडी यांची शिर्डी येथील बदली आणि त्यांच्या जागी मुटकुळे यांची नियुक्ती वैध ठरवली आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra Weather Update : पाऊस पुन्हा परतला! राज्यातील दहा जिल्ह्यांना IMD...

0
मुंबई | Mumbai गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऑक्टोबर हिटचा (October Hit) चटका चांगलाच जाणवत आहे. यामुळे मुंबई, पुणे आणि नाशिकसह महाराष्ट्रातील (Maharashtra) इतर जिल्ह्यांत उकाडा...