मुंबई । Mumbai
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या वांद्रे येथील ‘मातोश्री’ परिसरात अचानक ड्रोन घिरट्या घालत असल्याचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, हा गंभीर सुरक्षेचा प्रश्न मानला जात आहे. ठाकरे गटातील अनिल परब, सचिन अहिर यांसारख्या नेत्यांनी हा प्रकार संशयास्पद असल्याचे सांगून नाराजी व्यक्त केली होती.
यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ (माजी ट्विटर) खात्यावरून या घटनेविषयी माहिती दिली. त्यांनी लिहिले, “आज सकाळी आमच्या निवासस्थानात डोकावणारा एक ड्रोन पकडला गेला. माध्यमांमधून हे प्रकरण समोर आल्यानंतर MMRDA कडून स्पष्टीकरण देण्यात आले की हा बीकेसी परिसरासाठी केला जाणारा सर्वेक्षणाचा भाग आहे. तसेच मुंबई पोलिसांची परवानगी घेतली आहे, असेही सांगण्यात आले. ठीक आहे, पण काही प्रश्न अद्याप अनुत्तरितच राहतात.”
यानंतर आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत काही मुद्दे मांडले. त्यांनी विचारले की, “नेमका असा कोणता सर्वे आहे ज्यामध्ये घरांच्या वरून उड्डाण करण्याची गरज भासते? ड्रोन पकडले गेल्यानंतर तो ताबडतोब पळून का गेला? जर हे सर्व काम अधिकृत असेल, तर परिसरातील रहिवाशांना याची पूर्वसूचना का देण्यात आली नाही? बीकेसीसारख्या मोठ्या क्षेत्रासाठी सर्वेक्षण चालू असताना फक्त आमच्या घरावरच ड्रोन का दिसला?”
याचबरोबर त्यांनी एमएमआरडीएवर टीकाही केली. “MMRDA ने जमिनीवर उतरून MTHL (अटल सेतू) सारख्या भ्रष्टाचार व निकृष्ट कामांच्या उदाहरणांवर लक्ष केंद्रित करावे, ड्रोनद्वारे आमच्या घरावर लक्ष ठेवण्यापेक्षा,” असे त्यांनी म्हटले. तसेच, जर पोलिसांनी या सर्वेक्षणासाठी परवानगी दिली असेल, तर त्याबाबत स्थानिकांना किंवा परिसरातील रहिवाशांना माहिती का देण्यात आली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर जनतेतही या ड्रोनविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत. मातोश्री परिसर हा उच्च सुरक्षा झोन मानला जातो. अशा परिसरात अचानक आणि विनापूर्वसूचना ड्रोन उडणे ही चिंतेची बाब मानली जाते. यामुळे सुरक्षा व्यवस्थेबाबतही चर्चा रंगल्या आहेत. या प्रकरणातील वस्तुस्थिती काय आहे? ड्रोन सर्वेक्षणाचा उद्देश नेमका कोणता होता? याची माहिती पुढील चौकशीमधून स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या या घटनेने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात नवा वाद निर्माण केला आहे, इतके मात्र निश्चित.




