Friday, September 4, 2026
HomeनगरShrirampur : मातुलठाणमधील पोल्ट्री फार्ममुळे दुर्गंधी आणि माशांचा उपद्रव

Shrirampur : मातुलठाणमधील पोल्ट्री फार्ममुळे दुर्गंधी आणि माशांचा उपद्रव

नागरिकांच्या आरोग्याला धोका || तक्रारीनंतर ग्रामसभेने केला ना हरकत दाखले रद्दचा ठराव

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

तालुक्यातील मातुलठाण येथे वस्तीच्या परिसरात सुरू असलेल्या पोल्ट्री फार्ममुळे दुर्गंधी व माशांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. या त्रासामुळे नागरिकांच्या व जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने संबंधित पोल्ट्री धारकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी विविध शासकीय कार्यालयाकडे लेखी स्वरूपात केली आहे. तसेच संबंधित पोल्ट्री फार्मला ग्रामपंचायतीने दिलेले ना-हरकत दाखले रद्द करण्याची मागणी ग्रामसभेत करण्यात आली. याबाबत ग्रामसभेत ठरावही करण्यात आला आहे.

मातुलठाण येथील मिरा दिगंबर वाणी, सोमनाथ मारुती बोर्डे व जयश्री सोमनाथ बोर्डे यांच्या मालकीच्या पोल्ट्री फार्मबाबत ग्रामस्थांनी 5 जून 2026 रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता. पोल्ट्री फार्ममधून दुर्गंधी येत असून माशांचा प्रचंड उपद्रव होत असल्याने परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारीनंतर ग्रामपंचायतीकडून संबंधित पोल्ट्री फार्मधारकांना नोटीसा बजावण्यात आल्या. त्यानंतर प्रशासक व प्रशासकीय समिती तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील, तक्रारदार महिला-पुरुष आणि संबंधित पोल्ट्री फार्मधारक यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान दुर्गंधी व माशांचा त्रास असल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान, पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी देण्यात आलेल्या ना-हरकत दाखल्यातील अटी व शर्तींचे पालन होत नसल्याचेही ग्रामपंचायतीच्या कागदपत्रांत नमूद आहे. पोल्ट्री फार्ममध्ये स्वच्छता राखणे, पक्ष्यांची विष्ठा व कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावणे, दुर्गंधी होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करणे, माशांचा व किड्यांचा प्रादुर्भाव रोखणे, मृत पक्ष्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे आदी बाबींचा त्यात समावेश आहे. पोल्ट्री फार्म परिसरात झाडांची लागवड करणे, हवेच्या दिशेने प्रदूषण होणार नाही याची काळजी घेणे, नियमित निर्जंतुकीकरण व साफसफाई करणे, पक्ष्यांची विष्ठा व इतर कचर्‍यावर मातीचा थर देणे, सांडपाण्याची योग्य व्यवस्था करणे यासह विविध अटी घालण्यात आल्या आहेत. तसेच पक्ष्यांचा मृत्यू झाल्यास तातडीने पशुवैद्यकीय अधिकार्‍यांना कळविणे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे नमूद आहे.

ग्रामसभेच्या चर्चेत संबंधित पोल्ट्री फार्मधारकांना यापूर्वीही अटींचे पालन करण्याबाबत सूचना व नोटिसा देण्यात आल्या होत्या, मात्र अपेक्षित सुधारणा झाल्या नसल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांनी पोल्ट्री फार्मच्या ना-हरकत दाखल्याबाबत तीव्र आक्षेप घेतला. ग्रामपंचायतीने दिलेला ना-हरकत दाखला रद्द करून कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात प्राथमिक आरोग्य केंद्र, निमगाव खैरी येथील वैद्यकीय अधिकार्‍यांनीही पोल्ट्री फार्मची पाहणी केली. पाहणीदरम्यान कोंबडीच्या पक्ष्यांमुळे परिसरात दुर्गंधी व माशांची संख्या वाढल्याचे आढळून आल्याचे त्यांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या परिस्थितीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने योग्य ती कार्यवाही करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

पोल्ट्री फार्मधारकांकडून समाधानकारक खुलासा न झाल्याने तसेच दुर्गंधी, माशांचा प्रादुर्भाव आणि आरोग्याचा धोका कायम असल्याने 4 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या ग्रामसभेत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर संबंधित पोल्ट्री फार्मला व्यवसायासाठी देण्यात आलेला ना-हरकत दाखला रद्द करण्याबाबत सर्वानुमते ठराव करण्यात करण्यात आला. दरम्यान, ग्रामस्थांच्या तक्रारी, आरोग्य विभागाची पाहणी आणि ग्रामसभेचा ठराव यामुळे आता संबंधित पोल्ट्री फार्मच्या ना-हरकत दाखल्याबाबत प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे मातुलठाण ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. नियम व अटींचे पालन करून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही, यासाठी प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

पोल्ट्री फार्ममुळे तयार झालेल्या माशा या परिसरातील असलेल्या गायींवर बसत असल्याने त्यांना त्रास होत असून त्यामुळे दूध उत्पादनात घट होत आहे. तसेच अनेक जनावरांना रोगाची लागण होवून जनावरे मृत्यू पावली आहे. या माशा घरातील खाद्य पदार्थांवर बसत असल्याचे लहान मुलांबरोबरच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून काहींना विविध रोगाची लागण होत असल्याच्या तक्रारीही नागरिकांमधून होत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 38 शिवभोजन चालकांसाठी सव्वा कोटी मंजूर

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गरिबांना अवघ्या 10 रुपयांत पोटभर जेवण उपलब्ध करून देणार्‍या शिवभोजन थाळी योजनेला नगर जिल्ह्यात प्रतिसाद मिळत असला, तरी या योजनेचे केंद्रचालक मात्र,...