Thursday, October 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजरायगडच्या दिवेआगर समुद्रात आळंदी येथील ८ विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

रायगडच्या दिवेआगर समुद्रात आळंदी येथील ८ विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

पुणे |प्रतिनिधी| Pune

रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर पोहण्यासाठी उतरलेल्या पुण्याच्या आळंदी येथील खाजगी क्लासच्या आठ विद्यार्थ्यांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही भीषण दुर्घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास घडली. तीन दिवसांच्या सलग सुट्ट्यांचे औचित्य साधून आळंदी येथील एका खाजगी क्लासचे ११ वी आणि १२ वी सायन्सचे ४२ विद्यार्थी सहलीसाठी दिवेआगर येथे आले होते. किनाऱ्यावर आनंद लुटत असताना घडलेल्या या अचानक दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात आणि आळंदी शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, आळंदीवरून खाजगी क्लासचे ४२ विद्यार्थी बसने दिवेआगर येथे पर्यटनासाठी आले होते. समुद्रकिनाऱ्यावर फिरताना यातील काही विद्यार्थी समुद्रात पोहण्यासाठी पाण्यात उतरले. कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर नेहमी भरती-ओहोटीचा प्रभाव असतो आणि समुद्रातील पाण्याचा अंदाज सहज येत नाही. अनेकदा पायाखालची वाळू सरकून पाण्याखाली अचानक खड्डा (स्थानिक भाषेत ‘टाळ’) तयार होतो. पोहत असताना एका विद्यार्थ्याला अशाच प्रकारे पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी गेलेले इतर विद्यार्थीही समुद्राच्या पाण्याच्या प्रवाहात ओढले गेले. पाण्याच्या खोलीचा अन् प्रवाहाचा अंदाज न आल्याने आठही विद्यार्थी खोल पाण्यात ओढले गेले अन् त्यांचा बुडून मृत्यू झाला.

दुर्घटना घडल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिक, जीवरक्षक, पर्यटक तसेच पोलीस आणि तटरक्षक दलाच्या पथकाने तात्काळ समुद्रात उतरून मदतकार्य सुरू केले. समुद्रातून आठही जणांना बाहेर काढून रुग्णवाहिकेने बोरली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी तपासणीअंती आठही विद्यार्थ्यांना मृत घोषित केले. या दुर्घटनेत इतर कोणताही विद्यार्थी जखमी किंवा अस्वस्थ नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

घटनास्थळाची माहिती मिळताच दिवेआगरचे तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांनी घटनेला अधिकृत दुजोरा दिला. आळंदी येथील अकॅडमीचे विद्यार्थी पोहण्यासाठी समुद्रात उतरले होते आणि एकाला वाचवण्याच्या प्रयत्नात आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून मृतदेह बोरली येथे आणल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महसूल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी आणि पोलीस पथक घटनास्थळी पोहचले असून मदतकार्य व पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

रायगड जिल्ह्यात पर्यटन हंगाम सुरू होत असतानाच ही मोठी दुर्घटना घडल्याने पर्यटन सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे. सध्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी बंद असल्याने किनाऱ्यावर नियमित असणारा प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा वावर कमी होता. यापूर्वीही रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावर अशा दुर्घटना घडल्या असून, पर्यटकांनी समुद्रात उतरताना पाण्याचा व भरतीचा अंदाज घेणे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे या घटनेनंतर अधोरेखित होत आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra News : परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून होईल; काँग्रेस प्रभारी डॉ. सिरिवेल्ला...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai देशाची लोकशाही आणि संविधान संपवण्याची प्रक्रिया सुरु आहे. भाजपने निवडणूक आयोगाला स्वतःचे एजंट बनवले असून देशात चोरांचे राज्य आहे. मतचोरी,...