नाशिक | प्रतिनिधी | Nashik
‘जात आणि समाजाच्या चौकटीबाहेर जाऊन लग्न केलेस तर तुला सुखाने जगू देणार नाही’, या संकुचित मानसिकतेतून आलेल्या रागापोटी एका १९ वर्षीय नवविवाहितेचा छळ करण्यात आला. मात्र, संशयित नातेवाईकांच्या मनसुब्यांना उधळून लावत तिने दाखवलेले धाडस एका कौटुंबिक अत्याचाराच्या प्रकरणाला फाटा देणारे ठरले आहे. नाशिकच्या (Nashik) आडगाव परिसरातून अपहरण करून थेट नागपूरच्या (Nagpur) रामटेक येथे डांबून ठेवलेल्या या विवाहितेने कौशल्याने सुटका करून घेत पोलिसांत धाव घेतली असून, या घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे.
तीन वर्षांपूर्वी सोशल मीडियावरून (Social Media) झालेल्या ओळखीचे रूपांतर नात्यात करत तरुणीने २० एप्रिल २०२६ रोजी कुटुंबियांचा विरोध पत्करून नाशिकमध्ये प्रेमविवाह केला. परंतु, हा विवाह पचनी न पडलेल्या माहेरच्या मंडळींनी नात्याचा गोडवा दाखवून कटकारस्थान रचत हे अपहरण केले. ११ ऑगस्ट रोजी मुलीचे आई-वडील, काका, मावशी आणि मामा यांनी मुलीच्या आजारी सासू-सासऱ्यांना भेटण्याचा बहाणा केला. सासऱ्यांना रुग्णालयात नेण्याच्या नावाने १२ ऑगस्ट रोजी मुलगा व मुलीस कारमध्ये बसवले.
मात्र, पुणे रोडवरील (Pune Road) शिंदे पळसे टोलनाक्याजवळ पोहोचताच जावयाला धाक दाखवून कारमधून खाली उतरवून दिले आणि तरुणीस पळवून नेले. तरुणीला नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे मामाच्या घरी नेण्यात आले. तिथे तिला मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला. तुझा हा विवाह आम्हाला मान्य नाही, तुझे आमच्याच समाजातील दुसऱ्या मुलाशी लग्न लावून देऊ, असा तगादा लावत आई-वडील आणि मामाने तिला मारहाण केली.
सोमवारी पहाटेचा ताे निर्णय
सलग दीड महिना डांबून ठेवल्यानंतरही पीडितेने हार मानली नाही. सोमवारी (दि. २८) पहाटेच्या सुमारास मामा-मामी गाढ झोपेत असताना, तिने हुशारीने आणि धाडसाने घरातून पळ काढला. पाठीमागे भाडोत्री गुंड किंवा नातेवाईक पाठलाग करतील या भीतीखाली, सतर्कतेने एसटी बस आणि रेल्वेचा प्रवास करत ती थेट नाशिकमध्ये सासरी पोहोचली. तिच्या या एका निर्णयामुळे संशयितांचे मनसुबे उधळले गेले.
आडगाव पोलिसांत गुन्हा
पीडितेने नाशिक गाठताच पतीने तिला धीर देत आडगाव पोलीस ठाणे (Aadgaon Police Station) गाठले. पीडितेच्या फिर्यादीवरून शिरपूर (धुळे) येथील आई-वडील, कुऱ्हा (जि. अमरावती) येथील काका-मावशी आणि नगरधन (जि. नागपूर) येथील मामा यांच्याविरोधात अपहरणासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार बहिरम तपास करत आहेत.




