Friday, May 3, 2024
Homeनगरश्रीगोंद्याच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा पोटे यांच्याविरोधात अविश्वास दाखल

श्रीगोंद्याच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा पोटे यांच्याविरोधात अविश्वास दाखल

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा नगर पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा शुभांगी मनोहर पोटे यांच्या विरोधात 19 पैकी 16 नगरसेवकानी विविध आरोप करत अविश्वास दाखल केला आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. प्रस्तावावर राष्ट्रवादी आणि भाजपच्या सर्व नगरसेवकांच्या सह्या आहेत.

- Advertisement -

श्रीगोंदा पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष शुभांगी पोटे यांच्या गैरकारभारामुळे तसेच नगरसेवकांना विश्वासात घेऊन कामकाज करत नव्हत्या. तसेच त्यांनी नगराध्यक्षपदाच्या कालावधीमध्ये मनमानी पध्दतीने कारभार केला. निधी मंजुरी आणि त्याच्या वापरात देखील मनमानी करून नगरसेवकांमध्ये दुजाभाव करत. एवढेच नव्हेतर त्यांच्या नगराध्यक्षापदाच्या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडे त्यांच्या अनियमीतता तसेच भ्रष्टाचार बाबतीत तक्रारी दाखल आहेत.

त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे तक्रारी आहेत. यामुळे 16 नगरसेवकांनी अविश्वास दाखल केला आहे. अविश्वास प्रस्तावावर भाजप, राष्ट्रवादी नगरसेवकांच्या सह्या आहेत. यामध्ये वनिता क्षीरसागर, शहाजी खेतमाळीस, मनीषा वाळके, मनीषा लांडे, आसाराम खेंडके, सोनाली घोडके, निसार जाफर बेपारी, ज्योती खेडकर, रमेश लाढाणे, संतोष कोथिंबीरे, सिमा गोरे, छाया गोरे, सुनीता खेतमाळीस, गणेश भोसे, संग्राम घोडके, दीपाली औटी यांचा सह्या करणार्‍यांत समावेश आहे.

जुन्या तक्रारीच्या अपिलावर मंत्रालयात सुनावणी

श्रीगोंदा पालिकेच्या नगराध्यक्ष शुभांगी पोटे आणि त्यांचे पती तत्कालीन गटनेते नगरसेवक मनोहर पोटे यांना अपात्र करण्याबाबत महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम, 1986 मधील कलम 3 (1)(अ) तक्रार केली होती. मात्र, जिल्हाधिकारी यांनी फेटाळलेले होते. या निर्णयाविरोधात नगरविकास विभागाकडे संभाजी बिग्रेड जिल्हाध्यक्ष टिळक भोस, सतीश बोरुडे, अखतर शेख, ऋषिकेश गायकवाड यांनी अपील दाखल केले होते, यावर सुनावणीसाठी 7 नोव्हेंबरला दुपारी मुख्यमंत्री यांच्या समिती कक्ष, मंत्रालय, मुंबई येथे सुनावणी घेण्यात येणार असल्याने तिथेही नगराध्यक्ष शुभांगी पोटे आणि नगरसेवक मनोहर पोटे यांची कसोटी लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या