Thursday, September 10, 2026
Homeक्राईमAhilyanagar : एमडी ड्रग्सचे धागेदोरे शोधण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान

Ahilyanagar : एमडी ड्रग्सचे धागेदोरे शोधण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान

तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी || मोठ्या रॅकेटशी संबंध असल्याचा संशय

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सावेडी उपनगरातील मिस्किनमळा परिसरातून जप्त करण्यात आलेल्या सुमारे 31 लाख रूपये किमतीच्या 150 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) प्रकरणाची मुख्य साखळी उघड करण्याचे मोठे आव्हान तोफखाना पोलिसांसमोर उभे राहिले आहे. या प्रकरणातील अटक केलेल्या झिशान सय्यद, रेहान शेख आणि वसीम बागवान या तिघांना सोमवारी (20 जुलै) न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 24 जुलैपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
रविवारी (19 जुलै) तोफखाना पोलिसांचे गुन्हे शोध पथक गस्त घालत असताना मिस्किनमळा परिसरात एक कार संशयास्पदरीत्या फिरताना दिसली.

- Advertisement -

या कारमधील दोघे जण पसार होण्यात यशस्वी झाले, तर झिशान सय्यद, रेहान शेख आणि वसीम बागवान या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. वाहनाची झडती घेतली असता सुमारे 150 ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. याशिवाय पिस्तुलासारखे दिसणारे लायटर, एअर गन, मास्क, कटावणी तसेच दरोड्यासाठी वापरले जाऊ शकणारे अन्य साहित्यही पोलिसांनी जप्त केले. या सर्व साहित्यामुळे केवळ अमली पदार्थ तस्करीच नव्हे, तर अन्य गंभीर गुन्ह्यांचाही पोलिसांना संशय आहे.

तपासादरम्यान संशयित आरोपींचे मोबाईल कॉल डिटेल्स, व्हॉट्सअ‍ॅप चॅट, बँक व्यवहार आणि आर्थिक देवाणघेवाणीची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. जप्त करण्यात आलेले मेफेड्रोन नेमके कोठून आणले, ते कोणाला पुरवले जाणार होते, तसेच या आरोपींचे राज्यातील किंवा राज्याबाहेरील मोठ्या अमली पदार्थ तस्करीच्या रॅकेटशी संबंध आहेत का, याचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. याशिवाय कारमधून पसार झालेल्या दोघा संशयितांचा शोध घेणे, त्यांना अटक करणे आणि संपूर्ण टोळीचा पर्दाफाश करणे हे तपासातील प्रमुख उद्दिष्ट आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या साहित्याचा उपयोग दरोडा, अपहरण किंवा अन्य गंभीर गुन्ह्यासाठी होणार होता का, याचाही तपास पोलीस करीत आहेत.

तपासासाठी आरोपींची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे कारण न्यायालयासमोर मांडण्यात आले. त्यानुसार न्यायालयाने तिघांना 24 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या चार दिवसांत तपास यंत्रणा आरोपींची कसून चौकशी करून एमडी पुरवठा साखळीतील इतर संबंधित आरोपी, आर्थिक व्यवहार आणि संभाव्य गुन्हेगारी नेटवर्कचा उलगडा करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : १० सप्टेंबर २०२६ – पर्जन्यखंडाचे संकट

0
जुलैत सर्वदूर हजेरी लावणार्‍या पावसाने ऑगस्टपासून राज्याच्या बहुतांश भागाकडे पाठ फिरवली आहे. १ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान ११ जिल्ह्यांत ३० दिवसांहून अधिक दिवस पावसाचा...