नाशिक | पंचांगभास्कर विद्याधरशास्री करंदीकर
दिवाळी सण शरद ऋतूच्या मध्यभागी येत असतो. या काळात नवीन धान्य घरात येण्यास सुरुवात झालेली असते. त्यामुळे सर्वत्र आनंद असतो आणि या आनंदाचा उत्सव म्हणजेच दिवाळी. दिवाळीच्या तीन दिवसांनिमित्त पौराणिक कथा, परंपरा याबाबत धर्मग्रंथांमध्ये अनेक संदर्भ आढळतात. ते जाणून घेताना त्यांचा भावार्थही जाणून घेणे गरजेचे ठरते.
रूढार्थाने दीपावलीचा पहिला दिवस म्हणजे नरकचतुर्दशी. हा दिवस खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. या दिवशी अभ्यंगस्नान अरुणोदयापूर्वी करावे, असे शास्त्रात सांगितले आहे. अभ्यंगस्नानानंतर या दिवशी फराळ करण्याची प्रथा आहे. यामध्ये प्रामुख्याने तेलकट पदार्थ अधिक प्रमाणात असतात. याचे कारण पुढे येणार्या थंडीच्या काळासाठीची ऊर्जा त्यातून मिळावी, असे अपेक्षित आहे. नरकचतुर्दशी दिवशी अपमृत्यू येऊ नये म्हणून यमाची १४ तर्पणे करायला सांगितली आहेत. तर्पण फत पितरांसाठीच करायचे असते असा अनेकांचा समज आहे, पण देवांसाठीही तर्पण केले जाते. यम हा आद्य पितर आहे. यम, धर्म, मृत्यू, अंतक, वैवस्यत, काल, सर्वभूतक्षयकर, औदुंबर, नील, परमेश्वर, रुपदोर, चित्र आणि चित्रगुप्त आदी १४ नावांनी या दिवशी तर्पण करावयाचे असते. नरकचतुर्दशी आणि भाऊबीज या दोन्ही दिवशी ही तर्पणे करावीत. ज्यांचे वडील हयात नाहीत त्यांनी पाण्यात तीळ घालून, ज्यांचे वडील हयात आहेत त्यांनी पाण्यात अक्षता घालून तर्पण करावे, असे शास्रात सांगितले आहे.
नरक चतुर्दशीनंतर येणारा दिवस लक्ष्मीपूजनाचा. धर्मशास्त्राप्रमाणे समुद्रमंथनातून लक्ष्मीचा जन्म झाला तो अमावास्येच्या दिवशी. अथर्व वेदामध्ये यासंदर्भात एक सूत दिलेले आहे. ‘सर्व देव माझ्या ठिकाणी निवास करतात. त्यामुळे माझे पूजन झाले पाहिजे’. त्यामुळे या दिवशी लक्ष्मीपूजन करावे, असे धर्मशास्र सांगते. लक्ष्मीपूजनासाठीची अमावास्या घेताना ती प्रदोषकाळ व्यापिनी घ्यावी, असे म्हटले आहे. त्यामुळे ही पूजा प्रदोषकाळातच केली पाहिजे. पुराणकथांप्रमाणे या दिवशी लक्ष्मी रात्रभर संचार करून तिला राहण्यासाठी घर शोधत असते. जिथे तिला स्वच्छता, सौंदर्य, चारित्र्यसंपन्नता, कर्तव्यदक्षता, संयमी धर्मनिष्ठा असे गुण दिसतात तिथे ती वास करण्यास जाते असे मानले जाते.
लक्ष्मीपूजनानंतरचा दिवस म्हणजे बलीप्रतिपदा. इथेही प्रदोषकाळात बळीराजाची पूजा करायला सांगितली आहे. बळीराजा हा देवांचा राजा इंद्र आहे, असे धर्मशास्त्र सांगते. बळीराजा जनहितदक्ष राज्य करणारा होता. तो प्रल्हादाचा मुलगा असल्याने त्यावर विष्णुभतीचे झालेले संस्कार होते. तो एक कुशल प्रशासकही होता. बळीराजा अत्यंत दानशूर होता. विष्णूने दानासाठी मागितलेली तीन पावले जागा देण्यास बळीराजाने सहमती दर्शवली. या तीन पावलात भगवान विष्णूंनी दोन पावलात स्वर्ग आणि पृथ्वी व्यापली आणि तिसरा पाय बळीराजाच्या डोक्यावर ठेवला. बळीराजाला त्याच्या सर्व सत्कृत्यांबद्दल वर्षातून एकदा या तिथीला त्याची पूजा करण्यात येईल, असा वर भगवान विष्णूंनी दिला. त्यामुळे या प्रतिपदेला बळीराजाचे पूजन केले जाते. या बलीप्रतिपदेदिवशी वहीपूजन केले जाते. या दिवशी विक्रम संवत्सराला प्रारंभ होतो. पूर्वी व्यापार्यांचे वर्ष हे आश्विन अमावास्येला संपत असे आणि कार्तिक प्रतिपदेला सुरू होत असे. जुन्या सर्व खतावण्या या कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासूनच सुरू होणार्या असत. आजही गुजरात प्रांतात निघणार्या पंचांगांची सुरुवात कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासूनच होते. कारण त्यांच्याकडे विक्रम संवत्सर आहे. आपल्याकडे शालिवाहन शक आहे.
बलीप्रतिप्रदेच्या दिवशी घरातील स्त्री तिच्या पतीला ओवाळते. याला दिवाळी पाडवा असे म्हणतात. याच दिवशी गोवर्धनाची पूजा केली जाते. श्रीकृष्णाने इंद्राच्या कोपापासून गावकर्यांच्या रक्षणासाठी गोवर्धन पर्वत उचलून सर्वांना अभय दिले याची आठवण म्हणून या दिवशी घरात पर्वताची प्रतिकृती तयार करून त्याची प्रतिकात्मक पूजा केली जाते. भगवंताने केलेल्या या पराक्रमाबद्दल त्याला वेगवेगळ्या पदार्थांचा अन्नकूट बनवून त्याचा नैवेद्य दाखवला जातो.
बलीप्रतिप्रदेच्या दुसर्या दिवशी भाऊबीज येते. याला यमद्वितीयाही म्हटलेले आहे. या दिवशी यमराज आपली बहीण यमीच्या घरी भोजनाला गेले. म्हणून या दिवशी प्रत्येक भावाने या दिवशी आपल्या बहिणीच्या हातचे भोजन करावे आणि तिचा सत्कार करावा, भेटवस्तू द्याव्यात, असे शास्त्र सांगते. ज्याला सख्खी बहीण नसेल त्यांनी अन्य बहिणीच्या हातचे भोजन करावे, असे सांगितलेेले आहे. यमद्वितीयेच्या दिवशी यमधर्म, यमदूत, यमी, चंद्रगुप्त, मार्केंडेय आणि पितर यांची पूजा करायला सांगितली आहे.
दिवाळी हा उत्सव खास करून दिव्यांचा उत्सव आहे. यानिमित्ताने दीप या शब्दाची व्याख्या जाणून घेणे आवश्यक आहे. ‘दीप्यते दीपयती वा स्वं परंचेती’ म्हणजे जो स्वतः प्रकाशतो किंवा दुसर्याला प्रकाशित करतो तो दीप. दीप हा अग्नी किंवा तेजाचे प्रतीक आहे. हा दीप धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विद पुरुषार्थ मिळवून देणारा आहे.
दिव्यांचेही प्रकार असतात. देवळात लावल्या जाणार्या दिव्याला नंदादीप किंवा लामणदिवा म्हटले जाते. विवाहाच्या वेळी ऐरणी दान येते त्यावेळी आपण पिठाचे दिवे बनवतो त्याला पिष्ठदीप असे म्हटले जाते. पूर्वीच्या काळी ओवाळण्यासाठी लामण दिवा असायचा. जुन्या घरांमध्ये हा लामणदिवा दोन खोल्यांतील उंबरठ्यावर लावलेला असे. त्याचा उजेड हा दोन्ही खोल्यांतून पडावा हा त्यामागचा उद्देश असे. दिवाळी किंवा दीपोत्सव हा वैयक्तिक किंवा एका कुटुंबाचा सण नसून सार्वजनिक सणाप्रमाणे आपण साजरा केला पाहिजे.





