Tuesday, June 16, 2026
HomeराजकीयMeenakshi Natarajan : मोठी बातमी! काँग्रेसला निवडणुकीपूर्वी धक्का; उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा...

Meenakshi Natarajan : मोठी बातमी! काँग्रेसला निवडणुकीपूर्वी धक्का; उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद

दिल्ली । Delhi

देशभरात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात राज्यसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असतानाच, राजकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक वृत्त समोर आले आहे.

- Advertisement -

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्या अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्या ज्येष्ठ नेत्या मीनाक्षी नटराजन यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज कायदेशीर त्रुटींमुळे बाद ठरवण्यात आला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या मोठ्या घडामोडीमुळे काँग्रेस छावणीत प्रचंड खळबळ उडाली असून, पक्षाला हा अत्यंत मोठा धक्का मानला जात आहे.

मीनाक्षी नटराजन यांनी काँग्रेस पक्षातर्फे मध्य प्रदेशातून राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. काँग्रेसने ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्याची तयारी केली होती. मात्र, अर्ज छाननीच्या वेळी भारतीय जनता पक्षाने (भाजपा) नटराजन यांच्या अर्जावर आणि त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर गंभीर आक्षेप घेतले. नटराजन यांनी आपल्यावर दाखल असलेल्या न्यायालयीन तक्रारींची आणि फौजदारी गुन्ह्याशी संबंधित प्रकरणांची माहिती प्रतिज्ञापत्रात लपवून ठेवली असल्याचा आरोप भाजपाने केला. हाच तांत्रिक व कायदेशीर आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ग्राह्य धरत नटराजन यांचा उमेदवारी अर्ज अवैध म्हणजेच बाद ठरवला.

मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबाद मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात एका स्थानिक नगरसेविकेने मीनाक्षी नटराजन यांच्याविरोधात याचिका दाखल केलेली आहे. एका विनयभंग प्रकरणातील मुख्य आरोपीला नटराजन यांनी कायदेशीर संरक्षण दिले, असा आरोप या याचिकेत करण्यात आला होता. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५६, ६१ आणि ४५ अंतर्गत खटला चालवण्याची मागणी करण्यात आली असून नटराजन यांना न्यायालयातर्फे नोटीसही बजावण्यात आली होती.

राज्यसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात या गंभीर कायदेशीर बाबीचा उल्लेख करणे बंधनकारक असताना, नटराजन यांच्याकडून ही माहिती वगळली गेली. भाजपाने नेमका याच मुद्द्यावर बोट ठेवले आणि नटराजन यांचा अर्ज बाद ठरला. मध्य प्रदेशातील राज्यसभेच्या ३ जागांसाठी एकूण ४ उमेदवार रिंगणात होते. आता नटराजन यांचा अर्ज बाद झाल्यामुळे मैदानात केवळ तीनच उमेदवार शिल्लक राहिले आहेत, जे सर्वच्या सर्व भाजपाचे आहेत. त्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होण्याची चिन्हे असून काँग्रेसचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत.

या संपूर्ण प्रकरणावर आता महाराष्ट्रातूनही तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. दिल्लीत पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संसदेत ‘नारी सन्मान विधेयक’ मंजूर करण्याची भाषा करतात, पण दुसरीकडे एका प्रामाणिक, गांधीवादी महिला नेत्याचा अर्ज बेकायदेशीर आणि नियमबाह्य पद्धतीने फेटाळला जातो, हाच का तुमचा नारी सन्मान?” असा जळजळीत सवाल त्यांनी उपस्थित केला. अमित शहा यांच्या दबावाखालीच निवडणूक यंत्रणेने हे कृत्य केले असल्याचा थेट आरोपही राऊत यांनी केला आहे.

काँग्रेसकडे उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसे संख्याबळ असतानाही, जाणीवपूर्वक सत्ता बळाचा वापर करून हा अर्ज फेटाळण्यात आल्याचा दावा राऊत यांनी केला. या घडामोडीमुळे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हा मुद्दा आणखी गाजण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...