नाशिक | Nashik
भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) महाराष्ट्र विरुद्ध बडोदा रणजी ट्रॉफी सामन्यात हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब नाशिक येथे चौथ्या व अंतिम दिवशी दुसऱ्या सत्रात उपाहारानंतर थोड्या वेळाने बडोदा संघावर ४३९ धावांनी प्रचंड विजय मिळवला. महाराष्ट्रातर्फे दोन्ही डावात सातव्या क्रमांकावर येऊन सर्वाधिक ८३ व नाबाद १२६ धावा करणाऱ्या यष्टीरक्षक सौरभ नवले यास नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे, संघटनेचे चेअरमन धनपाल ( विनोद ) शहा यांच्या शुभहस्ते , सेक्रेटरी, समीर रकटे तसेच बीसीसीआयचे व्ही सामनाधिकारी नारायणकुट्टी ( केरळ ) व दोन्ही पंच क्रिशनेंदू पाल ( बंगाल ) व निखिल पटवर्धन ( इंदोर ), तसेच नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व दोन्ही संघा व उपस्थित चाहत्यांच्या उपस्थितीत सामनावीराचे खास पदक देऊन गौरविण्यात आले.
अंदाजानुसार चौथ्या दिवशी सकाळीच महाराष्ट्र संघाने दुसरा डाव , तिसऱ्या दिवस अखेरच्या ७ बाद ४६४ या धावसंख्येवर घोषित केला. यामुळे बडोदा संघास विजयासाठी अंतिम दिवसातील ९० षटकांत जवळपास अशक्यप्राय असे ६१७ धावांचे आव्हान मिळाले होते. पहिल्या डावा प्रमाणेच महाराष्ट्राच्या भेदक जलदगती गोलंदाजी समोर बडोदा संघाचा डाव केवळ ३६ षटकेच टिकू शकला. यात जलदगती मुकेश चौधरीने वैयक्तिक तिसऱ्याच व डावाच्या सहाव्याच षटकात पुन्हा एकदा सलामीची जोडी फोडली. व पुढे उत्कृष्ट कामगिरी करत डावात १३ षटकात ७६ धावांत ५ बळी टिपत विजयात मोठा वाटा उचलला.
त्यास रजनीश गुरबानीने ३ व रामकृष्ण घोषने २ बळी घेत उत्तम साथ दिली. पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावात देखील नाशिकच्या रामकृष्ण घोषने बडोदा कर्णधार कृणाल पंड्याचा महत्वाचा बळी मिळवला. वैयक्तिक तिसऱ्याच व डावाच्या १६ व्या षटकात रामूने एका बाजूने खेळत ४० धावा केलेल्या सलामीवीर जोस्निल सिंगला पहिल्याच चेंडूवर बाद केले. त्यानंतर आलेल्या कृणाल पंड्याने उत्तुंग षटकार ठोकला. पण त्याचं षटकातील ५ व्याच चेंडूवर केवळ ४ चेंडूत कृणाल पंड्याला बाद करत एकाच षटकात दुसरा धक्का देत सामना वाचविण्याच्या बडोदा संघाच्या अपेक्षा जवळपास संपवल्या. १५.५ षटकातच पाहुणे ५ बाद ७६. चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या अतित सेठने सर्वाधिक ५१ धावा केल्या. पण संघाचा प्रतिकार उपाहारानंतर तासाच्या आत ३६ षटकातच आटोपला.
दरम्यान, या रणजी हंगामातील एलिट ए ग्रुप मध्ये प्रथम स्थानी असलेल्या बडोदा संघास प्रचंड विजयाने धूळ चारली. तसेच या विजयाबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी महाराष्ट्र रणजी चमूतील सर्व खेळाडू , सपोर्ट स्टाफ सदस्य, तसेच निवड समितीचेही खास अभिनंदन केले.