Friday, May 3, 2024
Homeनाशिकरोजगारासाठी आदिवासी कुटुंबियांचे स्थलांतर

रोजगारासाठी आदिवासी कुटुंबियांचे स्थलांतर

ओझे । Oze

करोना विषाणूने शहरीभागासह ग्रामीण भागातही शिरकाव केल्यामुळे पेठ व सुरगाणा तालुक्यातील मजुरांनी घरी राहणे पंसद केले,

- Advertisement -

मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये कुटूबांचा उदर निर्वाह करण्यासाठी जवळ असलेला पैसा संपल्यांमुळे पुन्हा या मजुरानी पोटाची खळगी भरण्यासाठी दिंडोरी, निफाड, येवला, सिन्नर तालुक्यात स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.

करोनानामुळे लॉकडाऊनची स्थिती यामुळे पेठ, सुरगाणा तालुक्यातील मजुर घरीच बसून होते. पहिले एक ते दोन महिने घरामध्ये जे भांडवल होते त्यावर कशी बशी गुजरण केली. परंतु नंतरचा कालखंड मात्र अतिशय खडतर गेल्यामुळे या भागातील मजुरांवर उपासमारीची वेळ आली.

हाताला काम नाही आता संसाराचा गाडा कसा ओढायचा ही समस्या ‘ आ ’वासून उभी राहिली. त्यात पावसाची आणखी भर पडली इतर तालुक्यातही पाऊस पडत असल्यामुळे मजुराना शेतात पाहिजे तसे काम नाही. त्यामुळे या भागातील मजुरांना पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक संकटाचा सामना करावा लागला.

आता चार ते पाच दिवसांपासून परतीच्या पावसाने उघडीप दिल्यामुळे दिंडोरी तालुक्यात द्राक्षबागा छाटणीला जोमाने सुरुवात झाली आहे. पेठ, सुरगाणा तालुक्यातील मजुराना द्राक्षबागा छाटणी, काडीला पेस्ट करणे, काडी बांधणे तसेच तालुक्यात टोमॅटो बांधणी तसेच खुडणीचे काम मिळत असल्यांमुळे मजुर वर्गाच्या चेहर्‍यांवर आनंदाचे हसु दिसुन येत आहे.

सध्याच्या परिस्थितीमध्ये पेठ, सुरगाणा, सुतारपाडा व गुजरातच्या काही भागातील मजुर द्राक्षबागेच्या कामासाठी उपलब्ध होत आहे. दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांनी बागेच्या संपूर्ण कामासाठी टेंडर पद्धतीला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.

करोना कालखंड जरी संपला नसला तरी या मजुर वर्गाकडून शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होताना दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या