मुंबई | Mumbai
महायुती सरकारला (Mahayuti Government) विधानसभा निवडणुकीत तारणार्या लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) नवीन वर्षातील जानेवारी महिन्यातील हप्ता कधी मिळणार याकडे, संपूर्ण महिला वर्गाचे लक्ष लागून आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्ता मिळाली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून २१०० रुपये करू असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. मात्र अद्याप लाडक्या बहिणींना २१०० रुपयांचा वाढीव हफ्ता मिळालेला नाही.
अशातच आता लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हफ्ताबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी माध्यमांशी बोलतांना महत्त्वाची माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, “२६ जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा लाभ मिळेल असा प्रयत्न सुरू आहे. यासाठी ३ हजार ६९० कोटींचा निधी आम्हाला मिळणार आहे. अर्थसंकल्पाच्यावेळी (Budget) देखील महिलांना लाभ कसा मिळेल याची तरतूद आम्ही करणार आहोत”, असे त्यांनी सांगितले.
तटकरे पुढे म्हणाल्या की, “आम्ही फेब्रुवारीचे नियोजन सुद्धा करत आहोत. लाडकी बहीण योजनेचा लाभ आम्ही २ कोटी ४६ लाख महिलांना दिला.काही महिलांबाबत तक्रार आली होती. काही महिलांनी डबल अर्ज केले होते त्यामुळे थोडा घोळ झाला होता,पंरतु या केसेस कमी होत्या. त्यामुळे फार काही फरक पडेल असे मला वाटत नाही, थोड्याफार कमी होतील, असे त्यांनी म्हटले.
आतापर्यंत किती महिलांना पैसे मिळाले?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात जुलै ते डिसेंबर असे ६ महिन्यांचे पैसे जमा झाले आहे. यातील प्रत्येक महिन्याला १५०० असे मिळून एकत्रित ९ हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. राज्यभरातील सुमारे अडीच कोटी महिलांनी या योजेनचा लाभ घेतला आहे. मात्र आता जानेवारी महिन्याचे १५ दिवस उलटले तरी या महिन्याच्या हप्त्याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नव्हती. मात्र, आता मंत्री आदिती तटकरे यांनी स्वत:याबाबतची माहिती दिली आहे.