मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
गोशाळांसाठी जमीन खरेदी, दानपत्र किंवा भाडेकरार करताना आता कृषी दर लागू होणार असून याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी दिली.
गोशाळेतून सेवाभाव जपला जातो. भटक्या, आजारी, वृद्ध, अपघातग्रस्त गोवंशाचे संगोपन होते. देशी गोवंशाच्या जतनासह चारा लागवड होत असल्याने गोशाळा व्यावसायिक दरातून वगळण्याचा निर्णय घेतला असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
यापूर्वी स्पष्टता नसल्याने जमीन खरेदी, दानपत्र किंवा भाडेकरारावेळी या संस्थांना व्यावसायिक कंपनी समजून निवासी किंवा औद्योगिक दराने मूल्यांकन केले जात होते, असेही ते म्हणाले.
गोशाळांसाठी २५ लाखांचे अनुदान
गोशाळांना चारा लागवड आणि जनावरांच्या संगोपनाचा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या परवडणारा तसेच शाश्वत व्हावा, यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अधिकृत गोशाळांना २५ लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री, महसूलमंत्री आणि मंत्रिमंडळ उपसमिती राज्यातील प्रत्येक गोशाळा मजबूत करण्यासाठी कार्यरत असल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.




