Saturday, November 21, 2026
Homeक्राईमNashik Dindori News : पत्नीच्या खूनाची खोटी वर्दी देऊन पोलि‍सांची दिशाभूल; 'डायल...

Nashik Dindori News : पत्नीच्या खूनाची खोटी वर्दी देऊन पोलि‍सांची दिशाभूल; ‘डायल ११२’च्या गैरवापरप्रकरणी गुन्हा दाखल

​दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

पत्नीचा खून (Wife Murder) झाल्याची खोटी व धक्कादायक माहिती डायल ११२ या आपत्कालीन क्रमांकावर देऊन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात (Dindori Police Station) दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून, ही घटना शनिवार (दि. २१ नोव्हेंबर २०२६) रोजी सकाळी उघडकीस आली.

- Advertisement -

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमराळे बु. दूरक्षेत्र येथे पोलीस हवालदार दशरथ साबळे आणि मोरे हे डायल ११२ वर कर्तव्यावर असताना आज (शनिवार) सकाळी ७.२० वाजता ‘बोराचा पाडा’ येथे महिलेचा (Women) खून झाल्याचा कॉल आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ कॉलरच्या मोबाईल क्रमांकावर (८०१०२६१७६३) संपर्क साधला. त्यावेळी त्याने पत्नी गंगुबाई पुंडलिक डाबल हिचा विळवंडी शिवारात खून झाल्याचे सांगितले.

या माहितीच्या आधारे पोलीस पथक तातडीने विळवंडीकडे रवाना झाले आणि सरपंच विष्णू वाघेरे यांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी चौकशी केली असता, कॉल करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव पुंडलिक काशिनाथ डाबल (वय ३८, रा. विळवंडी, ता. दिंडोरी) असे सांगितले. मित्र रामदास सुखदेव मांडे (रा. सोनगाव, ता. दिंडोरी) याचा मोबाईल घेऊन त्याने हा कॉल केल्याचे निष्पन्न झाले. तसेच किरकोळ घरगुती भांडणानंतर पत्नी मुलांसह मामाच्या गावी निघून गेल्याचे त्याने कबूल केले.

सरपंच व साक्षीदारांच्या उपस्थितीत खातरजमा केल्यानंतर गंगुबाई व तिची मुले ही तिचे मामा रमेश पानडगळे (रा. कचरपाडा, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) यांच्याकडे सुखरूप असल्याचे स्पष्ट झाले. केवळ पोलिसांना (Police) त्रास देण्याच्या उद्देशाने आपत्कालीन सेवेचा दुरुपयोग केल्याप्रकरणी पोलीस हवालदार साबळे यांच्या फिर्यादीवरून पुंडलिक डाबल याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २१७ अन्वये दखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपासासाठी त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

​दरम्यान, आपत्कालीन स्थितीत, आपत्ती किंवा गंभीर घटनेच्या वेळी नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी डायल ११२ सेवा कार्यान्वित आहे. या सुविधेचा गैरवापर करून खोटे कॉल करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देत खऱ्या गरजेच्या वेळीच ११२ क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहन नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी व दिंडोरीचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या