शिर्डी । प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) दोन दिवसांचे ‘नवसंकल्प शिबिर’, आजपासून शिर्डी येथे सुरू झाले आहे. यासाठी राज्यातील पक्ष, आघाडी आणि विविध सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने शिर्डीत दाखल झाले आहेत. मात्र या अधिवेशनाला मंत्री धनंजय मुंडे हे येणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आजच्या शिबिराला येणार नाहीत, अशी माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली आहे. धनंजय मुंडे यांची प्रकृती ठीक नसल्याने ते आज परळीत राहणार आहेत. नुकतंच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली होती. मात्र धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून ते येणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागितल्याचा आरोप वाल्मीक कराड याच्यावर होत आहे. या खंडणीमुळेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा आरोप करण्यातल आला आहे. वाल्मीक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे असल्याचे बोलले जात आहे. यामुळे या प्रकरणात कारवाई होत नसल्याचा आरोप सुरू आहे. यामुळे या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राजकीय वर्तुळात सुरू आहे.