नाशिक | Nashik
पुणे शहरातील (Pune City) उच्चभ्रू वसतीतील खराडी भागातील स्टे बर्ड गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा (Police Raid) टाकला. यात तीन महिला व दोन पुरुषांचा समावेश असून, पार्टीदरम्यान अमली पदार्थ, दारू व हुक्काचा मोठ्या प्रमाणावर सापडले आहे. विशेष म्हणजे या पार्टीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसेंचा (Eknath Khadse) जावई आणि प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांचा देखील समावेश असून, त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. यावर आता एकनाथ खडसेंचे कट्टर विरोधक आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी महाजन म्हणाले की, “खराडीमधील प्रकरणाबाबत माझा पोलिसांशी अद्याप संपर्क झालेला नाही. पण नाथाभाऊचे जावई प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) या रेव्ह पार्टीत होते, असे समजले. तेच या रेव्ह पार्टीचे आयोजक असल्याची माहिती मला मिळाली आहे. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडले असून, त्यांना ताब्यात घेतले आहे. कालच नाथाभाऊंनी चाळीसगावला (Chalisgaon) गांजा सापडला असे म्हटले होते. मात्र, आता त्यांचे जावईच रेव्ह पार्टीत कसे काय सापडले? हा मोठा विषय आहे”, असे त्यांनी म्हटले.
तर जावयाला अटक (Arrested) झाल्यानंतर एकनाथ खडसेंनी माध्यमांशी बोलतांना “असं काही तरी होईल आणि कुटुंबातील सदस्याला अडकवण्यात येईल असे आपल्याला पूर्वीपासून वाटतं होते. अशा घटनेची पूर्वकल्पना होती”, असे म्हटले होते. त्यावर उत्तर देतांना महाजन म्हणाले की, “खेवलकर हा ट्रॅप होईल, असे वाटत असेल तर त्याला खडसेंनी अलर्ट का केले नाही? प्रत्येक वेळीच षडयंत्र कसे असेल. सात ते आठ जणांचे मोबाईल तपासल्यावर समोर येईल. त्यांच्या जावयांना कोणी कडेवर घेतलं आणि त्याठिकाणी नेऊन ठेवले,असं तर झालं नाही ना?” असा चिमटाही यावेळी महाजनांनी खडसेंना काढला.




