नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सिन्नरचे आमदार आणि राज्याचे कृषिमंत्री तथा नंदूरबारचे पालकमंत्री ॲड. माणिकराव काेकाटे (Manikrao Kokate) यांच्यासह त्यांचे बंधू विजय कोंकाटे यांना (दि. २०) नाशिक न्यायालयाने (Nashik Court) मोठा दणका दिला. जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त मुख्य न्यायाधिश रुपाली नडवादिया यांनी ३० वर्षांपूर्वी दाखल एका फसवणूक प्रकरणात काेकाटे बंधूना दाेषी ठरवून दाेन वर्षाच्या सश्रम कारावासासह प्रत्येकी पन्नास हजारांचा दंड ठाेठावला. मात्र, काेकाटे बंधूनी तत्काळ एक लाख रुपयांचा दंड भरुन शिक्षेनंतरचा जामिन मिळविला. यानंतर न्यायालयाने पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका केली असून आता या निकालाविराेधात काेकाटे वरिष्ठ न्यायालयात (Court) अपिल करणार आहेत.
प्रकरण काय?
माणिकराव कोकाटे आणि विजय कोकाटे (Vijay Kokate) यांनी तेव्हा शासनाकडून ‘थ्री पर्सेंट’ स्कीमच्या काेट्यातून सदनिका मिळविण्याचे प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी सदनिकेवर हक्क नसतानाही ताे सिद्ध करण्यासाछी बनावट दाखले यंत्रणेस सादर केले. ‘आमचे उत्पन्न कमी आहे, दुसरे घर नाही’, अशी माहिती शासनाला दिली. त्यानंतर शासनाकडून कोकाटे यांना सदनिका मिळाल्या हाेत्या. मात्रं, दिघाेळे यांनी प्रकरणाचा पाठपुरावा केल्याने सरकार पक्षाने फिर्याद दाखल केली हाेती. त्यानंतर, या प्रकरणात तेव्हापासून काेकाटे बंधू जामिनावरच हाेते. आता शिक्षा ठाेठावण्यात आली असली तरी ते जामीनावर सुटले आहेत.
शिक्षेनंतर मंत्री कोकाटे काय म्हणाले?
नाशिक जिल्हा न्यायालयाने (Nashik District Court) दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर माध्यमांशी बोलतांना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की,”रितसर निकाल लागलेला असून ट्रायल झाल्यानंतर निकाल लागतो. १९९५ सालचे हे प्रकरण असून या प्रकरणाचा निकाल उशिरा लागला आहे. त्यामुळे मी आता वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार आहे. तसेच हे प्रकरण न्याय प्रविष्ठ असल्याने या प्रकरणावर मी फार काही बोलणार नाही”, असे त्यांनी सांगितले.
मंत्री कोकाटेंची राजकीय वाटचाल
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) सोमाठाणे येथे २६ सप्टेंबर १९५७ रोजी ॲड. माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांचा जन्म झाला. कोकाटे यांना राजकारणात येण्यासाठी कुठलाही राजकीय वारसा नव्हता. त्यांनी राजकारणात येण्यापूर्वी कायद्याची पदवी घेतली. यानंतर त्यांनी राजकारणाची सुरुवात विद्यार्थी संघटना NSUI संघटनेत प्रवेश घेऊन केली. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) मधून राजकीय प्रवास सुरू केला. यानंतर माणिकराव कोकाटे यांनी १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीसाठी तिकीट नाकारल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार म्हणून त्यांनी सिन्नर विधानसभेची जागा पहिल्यांदा लढवली आणि जिंकली.
२००४ मध्ये त्यांनी ही जागा कायम ठेवली होती. यानंतर नारायण राणे (Narayan Rane) यांच्यासोबत २००९ मध्ये ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले. त्यानंतर २००९ साली सिन्नर विधानसभेतून ते तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. यानंतर २०१४ साली त्यांनी भाजकडून निवडणूक लढवली होती त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर पुन्हा २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि सिन्नरमध्ये त्यांनी चौथ्यांदा विजय मिळवला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर ते अजितदादा यांच्यासोबत गेले. यानंतर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ४१ हजारांच्या मताधिक्याने ते पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले.