अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघात 1966 ते 2026 या 60 वर्षांच्या कालावधीत अनेक रंजक आणि ऐतिहासिक लढती पाहायला मिळाल्या आहेत. या 60 वर्षांत जिल्ह्याला 9 आमदार मिळाले. यामध्ये 2008 मध्ये झालेल्या आठव्या निवडणुकीत मोठा उलटफेर झाला होता. तेव्हा अपक्ष उमेदवार अरुणकाका जगताप यांनी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार जयंत ससाणे यांचा धक्कादायक पराभव केला होता.
अहिल्यानगर जिल्ह्याचे राजकारण सुरुवातीपासूनच अत्यंत बेरकी आणि अनपेक्षित मानले जाते. त्यामुळे विधानसभा असो वा विधान परिषद, या ठिकाणी धक्कादायक निकाल लागण्याची परंपरा कायम आहे. यात विधान परिषदेच्या गेल्या 60 वर्षातील निवडणुकीचा इतिहास पाहता या मतदारसंघातून शेवगावचे रहिवासी आणि प्राथमिक शिक्षकांचे नेते पांडुरंग फलके पहिल्यांदा विजयी झाले. 1972 ला (दुसरी निवडणूक) शेवगाव तालुक्यातील मारुतराव घुले पाटील यांनी पारनेरचे माजी आमदार व अपक्ष उमेदवार बाळासाहेब भगत यांचा पराभव करत विजय मिळवला. 1978 ला (तिसरी निवडणूक) कर्जतचे आबासाहेब निंबाळकर यांनी नगर शहरातील जनता पक्षाचे उमेदवार झुंबरलाल सारडा यांचा पराभव केला.
1984 ची (चौथी निवडणूक) ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि रंजक ठरली. श्रीरामपूरचे माजी नगराध्यक्ष जनार्दन टेकावडे यांनी शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसकडून लढताना, कोपरगावचे काँग्रेसचे दिग्गज नेते शंकरराव कोल्हे यांचा अवघ्या एका मताने पराभव केला होता. पाचवी निवडणूक जनार्दन टेकावडे यांनीच पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत श्रीरामपूरचे अपक्ष उमेदवार मधुकर देशमुख यांचा पराभव केला. 1996 (सहावी निवडणुकीत) यशवंतराव गडाख यांची एंट्री झाली. त्यानंतरच्या सातव्या निवडणुकीत यशवंतराव गडाख शिवसेनेचे राहुरीचे उमेदवार डॉ. भारत ढोकणे यांचा पराभव केला. त्यानंतर सलग दुसर्यांदा सातव्या निवडणुकीत (6 वर्षांनी) निवडणूक लढवत गडाखांनी राहत्याच्या उमेदवार ममता पिपाडा यांना पराभूत केले.
2008 ला (आठवी निवडणूक) मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला. काँग्रेसकडून श्रीरामपूरचे जयंत ससाणे रिंगणात होते, तर त्यांच्यासमोर अपक्ष म्हणून नगरचे माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नेते अरुणकाका जगताप उभे होते. या प्रतिष्ठेच्या लढतीत जगताप यांनी ससाणेंचा पराभव करत विजय खेचून आणला. नवव्या निवडणुकीत अरुणकाका जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळाली. त्यांनी शिवसेनेचे प्रा. शशिकांत गाडे यांचा पराभव करत आपले वर्चस्व कायम राखले. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आतापर्यंत 9 आमदारांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. आता या मतदारसंघातून आता 10 वा आमदार होण्याची संधी कोणाला मिळणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
खर्च आणि गुंतागुंतीचे गणित
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक ही खर्चिक आणि राजकीयदृष्ट्या गुंतागुंतीची मानली जाते. आगामी निवडणुकीत इच्छुक उमेदवारांना हात सैल सोडून खर्च करावा लागणार, यात शंका नाही. या मतदारसंघात सध्या 461 मतदार (नगरसेवक) कार्यरत आहेत. मतदारांची संख्या मर्यादित असल्याने प्रत्येक मताला लाखमोलाचे महत्त्व आहे. यामुळे टप्प्यातच मतदारांना लाखमोलीची भूरळ पडल्यास उमेदवारांना कोट्यावधीचा खड्डा पडणार आहे. यामुळे वरवर सोपी दिसणारी ही निवडणूक आतून प्रचंड गुप्त आणि अनपेक्षित धक्का देणारी ठरत आल्याचा इतिहास आहे.




