मुंबई | Mumbai
राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने शिंदे गटातील नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेतल्याने महायुतीत भडका उडाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे आजच अद्वैय हिरे आणि राजू खरेंचा भाजपात प्रवेश झाला. त्यामुळे, महायुतीमधील भाजप-शिवसेनेतील वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यातच, आता या सर्व नाराजीनाट्यानंतर शिवसेना शिंदे गटातील मंत्र्याने या नाराजीला दुजोरा दिला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रीमंडळ बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपकडून शिवसेनेचेच नेते गळाला लावले जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. इतकेच नाही, तर शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळ बैठकीलाच गेले नाही, त्यामुळे या विषयाला तोंड फुटले. आता या विषयावर शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सविस्तर खुलासा केला आहे.
कुटुंबात वाद विवाद होत राहतात
कुटुंबात वाद विवाद होत राहतात मनातली भावना व्यक्त करायची असते. आम्ही आमच्या भावना मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या आहेत. निवडणुका सुरू आहेत, पक्ष प्रवेश सुरू आहेत. त्यामुळे थोडीशी नाराजी होती. जी नाराजी आहे याबाबत चर्चा झाली आहे, कुणीही महायुतीमधील नेते, पदाधिकारी, नगरसेवक एकमेकांच्या पक्षात घेणार नाहीत अशी चर्चा झाली. महायुतीमधील एकमेकांचे नेते, आमदार, नगरसेवक एकमेकांच्या पक्षात घ्यायचे नाहीत असे तिन्ही पक्षानी ठरवले आहे. उद्यापासुन याची अमलबजावणी होईल, असेही प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात
“राज्यात निवडणुका आहेत. त्यामुळे पक्षांतराचे वारे येतात. या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात असे चालू होते. प्रत्येक जिल्ह्यात पक्षांतरे होती. त्यात पालघर, सोलापूर, ठाणे आहे कल्याण-डोंबिवली आहे. अशा ठिकाणी एकमेकांना पक्षात घेण्यात चढाओढ सुरू होती. त्यामुळे नाराजी आमच्या लोकांची होती. थोडी त्यांच्या लोकांची होती. ही नाराजी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी समजून घेतले आणि त्यावर तोडगा काढला”, असे प्रताप सरनाईक म्हणाले.
सामोपचाराने तोडगा निघालेला आहे
“असा निर्णय झाला आहे की, महायुतीतील जे घटक पक्ष आहेत, त्यांनी मित्रपक्षांचे कोणतेही नेते, पदाधिकारी, माजी नगरसेवक आपल्या पक्षात घेऊ नये, अशी भूमिका ठरली आहे. प्रदेशाध्यक्ष आणि इतर पक्षातील नेते बसून निर्णय घेतील. पण, सामोपचाराने तोडगा निघालेला आहे. कुणी कुणाला काहीही सुनावलेलं नाहीये. काही गोष्टी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना विचारून होत नाही. काही कळत-नकळत घडतात. विसंवाद होऊ नये अशी सगळ्यांची भूमिका असल्याचे ठरले आहे”, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
असे हिरे, पाचू इकडे तिकडे जात असतात
दरम्यान, आज भाजपात झालेल्या दोन पक्षप्रवेशावरही सरनाईक यांनी भाष्य केलं. कोण अद्वय हिरे? राज्यात असे हिरे, पाचू आहेत जे इकडे तिकडे जात असतात, असे म्हणत भाजपात प्रवेश केलेल्या अद्वैय हिंरेंना अधिक महत्त्व नसल्याचे त्यांनी सुनावले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





