Monday, May 20, 2024
Homeनगरथोरातांनी आकडे क्लोज पाहिले की ओपन ?

थोरातांनी आकडे क्लोज पाहिले की ओपन ?

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते आ.बाळासाहेब थोरात व महाविकास आघाडीच्या आमदारांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेत जिल्हा नियोजन समिती व जिल्हा परिषदेमार्फत महाविकास आघाडीच्या ताब्यातील मतदारसंघांवर निधी देण्यात दुजाभाव दाखवला जात असल्याची तक्रार केली होती. त्यावर उत्तर देतांना थोरात हे आरोप करत असतांना त्यांचे अज्ञान प्रकट करत आहेत. मला माहिती नाही त्यांनी कोणते आकडे पाहिले. ते क्लोज होते की ओपनचे, ते मला माहिती नाही. ते पाहून मी लवकरच जाहीर करेन, अशा खोचक शब्दात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आ. थोरात यांना टोला लगावला.

- Advertisement -

समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताबद्दल मंत्री विखे यांनी शनिवारी नगरमध्ये प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दुःख व हळहळ व्यक्त केली. मात्र त्याचबरोबर महामार्गांवरील सुरक्षिततेच्या उपायांची आवश्यकता व्यक्त करताना परिवहन विभागावर नाराजी व्यक्त केली. आरटीओ सध्या काय करत आहे?, त्यांचे सर्व काम ऑनलाईन झाल्यामुळे कार्यालयात बसून राहण्याशिवाय आरटीओला काही काम नाहीत. त्यांनी खरे तर महामार्गांवर फिरले पाहिजे, त्या ठिकाणी उभे राहून वाहतुकीचे नियम पाळले जातात की नाही, महामार्गावरील सुरक्षित वाहतुकीकडे लक्ष दिले पाहिजे. आरटीओंनी त्यांच्या कामात बदल करण्याची आवश्यकता आहे, असे ना.विखे म्हणाले.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री समृद्धी महामार्गावरील वाढलेल्या अपघातांबाबत उपाययोजना करण्याचा योग्य तो निर्णय घेतील, असे ते म्हणाले. असे भीषण अपघात टाळता आले पाहिजेत. खाजगी ट्रॅव्हल एजन्सीच्या बससाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. पूर्वी त्यांना स्टेज कॅरियर म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव होता, परंतु खासगी बस पॉईंट टू पॉईंट व्यवसाय करतात. त्याकडे आरटीओने लक्ष दिले पाहिजे. एसटी महामंडळाच्या बसबरोबर खासगी ट्रॅव्हल बस सोडण्याचा विचार होता. त्याबाबत आता पूर्नविचार केला पाहिजे. आरटीओने या खाजगी ट्रॅव्हल बसची पॉईंट टू पॉईंट तपासणी केली पाहिजे. एसटी महामंडळाच्या यंत्रणेमार्फत या खाजगी ट्रॅव्हल एजन्सीच्या बसबाबत काही तपासणी यंत्रणा निर्माण करता येईल का, याबाबतही उपाययोजना केली पाहिजे अशाही सूचना विखे यांनी केल्या.

एक रुपयात पशुधन विमा योजना

राज्य सरकारने एक रुपयात पिकविमा योजना जाहीर केली, त्याच धर्तीवर पशुधनासाठी ही एक रुपयात विमा योजना लागू करण्याचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल. शेतकर्‍यांकडे लाखो रुपये किंमतीचे पशुधन असते. महागड्या पशुधनाचा विमा उतरवण्यासाठी, शेतकर्‍यांना मदत करण्याच्या हेतूने एक रुपयात पशुधन विमा योजना लागू केली जाईल, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही पशुसंवर्धन विकास मंत्री विखे यांनी जाहीर केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या