Wednesday, February 19, 2025
Homeनगरउपोषण करून आता काय साध्य करणार ?

उपोषण करून आता काय साध्य करणार ?

पालकमंत्री विखेंचा जरांगे यांना सवाल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

उपोषण करून आता काय साध्य करणार आहात, असा सवाल अहिल्यानगरचे पालकमंत्री व राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांना केला. सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आहे व त्याला कोणतीही स्थगिती नसल्याने त्यानुसार कामकाज सुरू आहे. तसेच इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची पहिल्यापासून भूमिका आहे. त्यामुळे आता जरांगे यांनी उपोषण सोडून द्यावे, असा सल्लाही विखे पाटील यांनी दिला.

- Advertisement -

नगरच्या वाडिया पार्क मैदानावर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होत आहे. त्याच्या मैदानाची पाहणी पालकमंत्री विखे यांनी केली. यावेळी स्पर्धा आयोजक आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला आदींसह अन्य उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी पालकमंत्री विखेंनी संवाद साधला. ज्येष्ठ नेते शरद पवार व ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याचे भाकीत केले आहे, त्यावर भाष्य करताना पालकमंत्री विखे म्हणाले, ज्यांना भूकंपाची भीती वाटते, त्यांनी शांततेत घरात बसावे. तिसरा उपमुख्यमंत्री होण्याची भाषा करणारे संजय राऊतच ते तिसरे उपमुख्यमंत्री होणार आहेत का? असा मिश्किल सवाल करून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आता राजकीय सीमारेषा आखून घेण्याचा सल्लाही विखे यांनी दिला. पवार हे मोठे व्यक्तिमत्व आहे, त्यांची देशाला गरज आहे. त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशा सदिच्छाही दिल्या.

पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल शंका उपस्थित करणे चुकीचे आहे, असे भाष्यही त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांवर केले. भाजपच्या सदस्य नोंदणी आढावा बैठकीस अनुपस्थितीबद्दल ते म्हणाले, मी व राम शिंदे पुण्यात संघाच्या चिंतन शिबिराला उपस्थित होतो. त्यामुळे या आढावा बैठकीस नव्हतो. मात्र, जिल्ह्यात भाजपची सदस्य नोंदणी राज्यात एक नंबरची होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महायुतीत कोणतीही नाराजी नाही. दोन-तीन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न आहे, परंतु तोही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोडवतील, असे स्पष्ट करून दावोसमधील गुंतवणूक करारावर आक्षेप घेणार्‍यांची वैचारिक दिवाळखोरी दिसू लागली आहे. कोट्यवधींची गुंतवणूक महाराष्ट्रमध्ये झाल्याने रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे, असेही विखे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

थारोतांच्या पराभवाचे कोडे सोडवत बसवावे
दरम्यान काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचा पराभव म्हणजे न उलगडणारे कोडे असल्याचे भाष्य केले आहे, त्यावर बोलताना विखे पाटील म्हणाले, ते कोडे आता जोशींनी सोडवत बसावे. उद्धव ठाकरे यांनी आता जय श्रीराम व जय शिवराय म्हणण्यातही काही अर्थ नाही. कारण ज्यावेळी त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुले उधळली होती, त्याचवेळी त्यांनी जय श्रीराम व जय शिवराय म्हणण्याचा हक्क गमावला होता, असे भाष्यही विखे यांनी केले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या