श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
अल्पवयीन मुलाशी मैत्री करून त्याच्यावर अनैसर्मिक लैंगिक अत्याचार केल्याचा तसेच त्याचे अश्लील व्हिडीओ चित्रीकरण करून व्हायरल करण्याची धमकी देत, वारंवार शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता व पॉक्सो कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर अल्पवयीन मुलाच्या फिर्यादीवरून सलमान सलीम इराणी, अली अब्बास सलीम इराणी, सलीम नुरअली इराणी, रहीम मिर्झा, मरियम हैदर इराणी या पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्वजण येथील इराणी गल्ली परिसरातील रहिवासी आहेत. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, सन 2024 पासून ते आजपर्यंत आरोपी सलमान सलीम इराणी व अली अब्बास सलीम इराणी यांनी फिर्यादीशी मैत्री करून त्याच्यासोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवले. यावेळी त्याचे मोबाईलमध्ये व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले. सदर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी वारंवार बळजबरीने अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, फिर्यादीच्या नातेवाईक मुलीने आरोपींविरोधात दिलेली तक्रार मागे घेण्याचा दबाव टाकण्यात आला. तक्रार मागे घेतली नाही तर फिर्यादीचा व्हिडीओ व्हायरल करू, अशी धमकी आरोपी सलीम नुरअली इराणी, रहीम मिर्झा, मरियम हैदर इराणी यांनी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तक्रार मागे न घेतल्याने संबंधित व्हिडीओ व्हायरल करून फिर्यादीची बदनामी केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता कलम 115(2), 351(2), 352, 3(5) तसेच पॉक्सो कायदा कलम 4, 6 व 11 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अप्पासाहेब हंडाळ करीत आहेत.




