अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहर परिसरात अपहरणाच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामवाडी येथील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी, तर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरेवाडी येथून एका विवाहित महिलेचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, 38 वर्षीय व्यक्तीच्या अल्पवयीन मुलीला रविवारी (25 ऑक्टोबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास हातमपुरा परिसरातून मुस्तफीन सतर सय्यद ऊर्फ काश्या (पत्ता माहिती नाही) याने अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याचा आरोप आहे.
मुलगी कायदेशीर पालकांच्या ताब्यात असताना तिला पळवून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दुसरी घटना भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरेवाडी येथे घडली. 25 वर्षीय तरूणाने याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या पत्नीचे (वय 22) रविवारी दुपारी दीड वाजण्यापूर्वी दरेवाडी येथून अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




