राहाता |वार्ताहर| Rahata
राहाता शहरात एका 14 वर्षीय अल्पवयीन बालिकेला जबरदस्तीने रिकाम्या फ्लॅटमध्ये ओढून नेऊन, तिचे हात-तोंड बांधून विनयभंग केल्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात आरोपी हरिदास अर्जुन गायकवाड याच्याविरुद्ध नवीन भारतीय न्याय संहिता आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यांतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, शनिवार दि. 6 जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास 14 वर्षीय पीडित मुलगी तिच्या मैत्रिणी आणि बहिणींसोबत दुकानात आईस्क्रीम आणण्यासाठी चालली होती. यादरम्यान ती पैसे आणण्यासाठी घरात परत आली असता, मैत्रिणी पुढे निघून गेल्याचा फायदा घेऊन दबा धरून बसलेल्या आरोपी हरिदास गायकवाड याने तिचा हात ओढला. तिने ओरडू नये म्हणून तोंड दाबून, खंडोबा मंदिराजवळील स्वतःच्या एका रिकाम्या फ्लॅटमध्ये तिला जबरदस्तीने ओढून नेले. तेथे आरोपीने पीडितेचे हात आणि तोंड ओढणीने बांधून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत विनयभंग केला. मुलगी बराच वेळ झाला तरी परत न आल्याने तिची मोठी बहीण, चुलत बहीण व मैत्रिणी शोधत तेथे आल्या. त्यांनी खोलीचा दरवाजा वाजवला असता आरोपीने पीडितेला बेडरूममध्ये कोंडले आणि बाहेर येऊन ती येथे आलीच नाही, पुढे गल्लीत बघा अशी खोटी माहिती देऊन त्यांची दिशाभूल केली.
तोंड बांधलेले असल्याने पीडितेला आवाज देता आला नाही. मात्र, काही वेळाने पीडितेने कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली आणि आरोपीला बाजूला ढकलून तेथून पळ काढला व रस्त्यात बहिणींना गाठून रडत रडत घडलेला प्रकार सांगितला. हा प्रकार घडल्यानंतर पीडितेने थेट आरोपीच्या दुसर्या पत्नीकडे जाऊन हकीकत सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी हरिदास तेथेही पोहोचला आणि हा प्रकार जर आई-वडिलांना सांगितला तर तुम्हा चौघींना चाकूने भोसकून मारून टाकीन, अशी धमकी दिली. रात्री आई-वडील कामावरून परत आल्यानंतर पीडितेने धीर धरून घडलेली आपबिती सांगितली. त्यानंतर कुटुंबियांनी तातडीने पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली.
राहाता पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी हरिदास अर्जुन गायकवाड याच्याविरुद्ध बीएनएस कलम 74 (महिलांचा विनयभंग), 127(2) (बेकायदेशीर डांबून ठेवणे), 352/351(2) (शांतता भंग व गुन्हेगारी धमकी), 115(2) (दुखापत करणे) आणि पोक्सो कायदा कलम 8 (अल्पवयीन बालकावरील लैंगिक अत्याचार) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक संगीता गिरी करत असून, फरार आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.




