नाशिक | Nashik
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ३१ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या नाशिक त्र्यंबकेश्वर (Nashik-Trimbakeshwar) सिंहस्थ महाकुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याच्या आयोजनादरम्यान आलेले अनुभव, विविध व्यवस्थांमध्ये जाणवलेल्या उणिवा आणि त्रुटी विचारात घेऊन त्या दूर करण्यासाठी आगामी कुंभमेळ्याचे अधिक प्रभावी, काटेकोर आणि सर्वसमावेशक नियोजन करण्यात येणार आहे. गर्दी व्यवस्थापन, भाविकांची सुरक्षितता, प्रवेश पास वितरण, पायाभूत सुविधा आणि विकासकामांची वेळेत पूर्तता यावर विशेष भर देण्यात येणार असून, सर्व यंत्रणांनी अधिक परस्पर समन्वय व सामंजस्यातून कामे गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश आज त्र्यंबकेश्वर येथे आयोजित आढावा बैठकीत देण्यात आले. भाविकांसह स्थानिक नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या.
बैठकीस खासदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) आमदार हिरामण खोसकर, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, उपनगराध्यक्ष पल्लवी शिरसाट, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलिस अधीक्षक एम. विमला आदी उपस्थित होते.
खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ३१ ऑक्टोबर रोजी पार पडलेला ध्वजारोहण सोहळा हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान होते. मात्र, सर्व विभागांनी उत्कृष्ट समन्वय राखत आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडल्यामुळे हा सोहळा यशस्वी झाला. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात लाखो भाविक सहभागी होणार असल्याने गर्दी व्यवस्थापनाला विशेष महत्त्व आहे. भाविकांना आणि स्थानिक नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, यासाठी आतापासूनच सूक्ष्म नियोजन करावे. कुंभमेळा हा लोकांचा महोत्सव असून, त्याच्या यशस्वीतेसाठी प्रशासनासोबतच नागरिकांचे सहकार्यही महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.
आमदार हिरामण खोसकर यांनी ध्वजारोहण सोहळ्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमांचे कौतुक केले. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकारी यांच्यात सातत्यपूर्ण संवाद व समन्वय असणे आवश्यक आहे. मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून कुंभमेळ्याच्या तयारीसाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल. सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करून कुंभमेळ्याचे नियोजन यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, राष्ट्रपतींचा नाशिक दौरा हा जिल्ह्यासाठी ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण होता. या दौऱ्याच्या अनुषंगाने प्रत्येक विभागाला जबाबदाऱ्या निश्चित करून देण्यात आल्या होत्या. सर्व यंत्रणांनी काटेकोर नियोजन व समन्वयातून काम केल्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने प्रवेश पास वितरणासह विविध व्यवस्थांचे नियोजन वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात येईल. ध्वजारोहण सोहळ्याच्या आयोजनादरम्यान आलेले अनुभव आणि जाणवलेल्या उणिवांचा आढावा घेऊन आवश्यक सुधारणा करण्यात येतील. सर्व विभागांनी आपापल्या कामांचा नियमित आढावा घेऊन प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.
पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी ध्वजारोहण सोहळ्यादरम्यान राबविण्यात आलेल्या बंदोबस्ताची माहिती दिली. सर्व विभागांच्या सहकार्यामुळे सुरक्षा व्यवस्था प्रभावीपणे राबविता आली. आगामी कुंभमेळ्यातही सुरक्षा आणि बंदोबस्ताच्या दृष्टीने समन्वय महत्त्वाचा राहणार आहे. साधू-महंतांच्या प्रवेश पासची प्रक्रिया आतापासूनच नियोजनबद्ध पद्धतीने सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. अपर पोलिस अधीक्षक एम. विमला यांनी राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बदल आव्हानात्मक होते. अशा परिस्थितीत सर्व यंत्रणांनी सतर्कता आणि समन्वय राखून आपापली जबाबदारी पार पाडल्याचे सांगितले.
त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार यांनी ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन हे शहरासाठी मोठे आव्हान होते. विविध विभागांच्या समन्वयातून हे आव्हान यशस्वीपणे पेलता आले. आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने शहरातील उर्वरित विकासकामे गतीने पूर्ण करावीत. कुशावर्त तीर्थ परिसरातील जलशुद्धीकरण तसेच परिसरातील सुरक्षा व बंदोबस्ताच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, उपजिल्हाधिकारी मीनाक्षी राठोड, श्री. घोरपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील रोहकाले, तहसीलदार गणेश जाधव, त्र्यंबक नगर परिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, अमोल चौधरी, पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक अमोल गोटे, पोलिस निरीक्षक श्री. कुलकर्णी, उपअभियंता विजय बाविस्कर यांचेसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ध्वजारोहण सोहळ्यादरम्यान जाणवलेल्या तांत्रिक अडचणी व व्यवस्थांमधील त्रुटी दूर करणे, विकासकामांना गती देणे, प्रवेश पास वितरणाची प्रक्रिया अधिक सुलभ व नियोजनबद्ध करणे, प्रवेशासाठीच्या याद्यांची पडताळणी आणि पुरेशी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनात अशा त्रुटींची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक उपाययोजना व सुधारणा आतापासूनच कराव्यात. सर्व विभागांनी परस्पर समन्वय व सामंजस्य राखून नियोजित वेळेत कामे पूर्ण करावीत, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. प्रारंभी तहसीलदार गणेश जाधव यांनी ध्वजारोहण सोहळ्याच्या आयोजनाची तसेच प्रवेश पास वितरण प्रक्रियेची माहिती दिली.




