पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbhmela) ध्वजारोहण सोहळ्यापूर्वी रामकुंड परिसरातील विकासकामांना मिळालेली गती ध्वजारोहणानंतर अचानक मंदावल्याचे चित्र दिसत आहे. सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वेगाने सुरू असलेली कामे आता जवळपास ठप्प झाली असून, मंगळवारी गोदाघाटाच्या उत्तरेकडील महिलांच्या वस्त्रांतरगृहाचे बांधकाम वगळता अन्य कोणत्याही कामाला गती असल्याचे दिसून आले नाही. रामकुंड परिसरातील सिंहस्थ कुंभमेळा आणि रामकाल पथाची अनेक कामे अद्याप अपूर्ण आहेत. ध्वजारोहण सोहळ्यावेळी ही अपूर्ण कामे तात्पुरती झाकून ठेवण्यात आली होती. सोहळा पार पडल्यानंतर ती पुन्हा सुरू होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात कामांना ब्रेक लागल्याचे चित्र आहे.
ध्वजस्तंभाच्या ठिकाणी उभारण्यात आलेला मंच हटविण्याचे काम अद्याप सुरू आहे. अहिल्याराम पटांगण ते दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीपर्यंतच्या पायऱ्यांचे बांधकामही अपूर्ण असून, सध्या ते बंद आहे. गांधी तलावातील पाणी काढून तलाव पुन्हा रिकामा करण्यात आला आहे. चक्रधर स्वामी मंदिरासमोरील घाटाच्या (Ghat) बांधकामालाही अद्याप पूर्णत्व आलेले नाही. पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या दगडी फरशा विस्कळीत झाल्या असून, त्यांची पुन्हा जोडणी करण्याचे कामही हाती घेण्यात आलेले नाही.
लक्ष्मणकुंड घाटाच्या पायऱ्या बसविण्याचे कामदेखील सध्या बंद आहे. घाटाच्या दुसऱ्या बाजूला सुरू असलेले बांधकाम अपूर्ण अवस्थेत असून, तेथील लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. विशेष म्हणजे, याच परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचा वापर सुरू झाला आहे. मात्र, पुलाजवळच बांधकामातील लोखंडी सळ्या उघड्या असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. संबंधित यंत्रणांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
दरम्यान, गोदावरी नदीतील (Godavari River) पाण्याची पातळी घटली असली, तरी काही प्रमाणात पाण्याचा प्रवाह अद्याप सुरू आहे. मेकॅनिकल गेटमधून चक्रधर स्वामी मंदिरासमोरील घाटाच्या बाजूने हे पाणी पुढे लक्ष्मणकुंडाच्या दिशेने वाहत आहे. त्यामुळे घाटाच्या उर्वरित कामांना सुरुवात करण्यापूर्वी या पाण्याचा प्रवाह नियंत्रित करणे आवश्यक ठरणार आहे.
वस्त्रांतरगृहाचे काम सुरू, बाकी ठिकाणी शांतता!
गोदाघाटाच्या उत्तरेकडील बाजूस महिलांसाठी वस्त्रांतरगृह उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. रामकुंड परिसरात मंगळवारी प्रत्यक्ष काम सुरू असल्याचे दिसलेले हे एकमेव ठिकाण होते. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसुविधांसाठी आणि रामकाल पथाच्या विकासासाठी हाती घेण्यात आलेली अनेक कामे अद्याप पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहेत. ध्वजारोहण सोहळ्यापूर्वी दाखविण्यात आलेली कामांची गती आता कायम राहणार की पुन्हा संथ कारभाराचा अनुभव येणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. कुंभमेळ्याला अद्याप अवधी असला, तरी अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने हालचाली करण्याची गरज आहे.




