अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल चाळे करणार्या आरोपीला विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी एच. मोरे यांनी दोषी धरून एक वर्ष सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. राहुल अशोक गायकवाड (वय 32 रा. हत्तलखिंडी, ता. पारनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या खटल्याचे कामकाज सुरूवातीला अतिरिक्त सरकारी वकील मंगेश दिवाणे यांनी व नंतर विशेष सरकारी वकील मनीषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले.
फिर्यादीची अल्पवयीन मुलगी (वय 15) घरामध्ये कॉटवर बसून टिव्ही पाहत असताना राहुल तेथे आला. ती अभ्यासाकरिता वह्या कॉटखालून घेत असताना राहुलने मुलीचा हात धरून तिला खाली पाडले व तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. या घटनेनंतर फिर्यादीने पारनेर पोलीस ठाण्यात 8 नोव्हेंबर 2023 रोजी राहुल गायकवाड विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंग, पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये अल्पवयीन पीडित मुलगी तसेच पीडित मुलीचे वडील, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी, तसेच वयासंदर्भात पारनेर नगरपंचायतचे माहितगार इसम यांची साक्ष नोंदविण्यात आली.
या केसची सुनावणी चालू असताना सरकारी वकीलांनी युक्तीवाद केला की, मुलगी ही घटनेच्यावेळी केवळ 15 वर्षांची होती. अशा कमी वयामध्ये घडलेल्या घटनेमुळे बालमनावर अतिशय वाईट परिणाम होत असतो व त्याचे ओरखडे आयुष्यभर त्यांच्या मनावर पडतात. आरोपीने अत्यंत वाईट पध्दतीने सदरची घटना केलेली आहे. त्यामुळे आरोपीला जर या केसमध्ये निर्दोष सोडले तर समाजातील वाईट प्रवृत्ती वाढीस लागून लहानग्या अल्पवयीन मुलांवर अशा घटना पुन्हा-पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला होता. सदर खटल्यात पैरवी अधिकारी पोलीस अंमलदार अडसुळ, शिवनाथ बडे यांनी सहकार्य केले.