अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सावेडी उपनगरात बुधवारी (19 फेब्रुवारी) सायंकाळी दोन कुटुंबांमध्ये अल्पवयीन मुलींच्या छेडछाडीवरून वाद झाला. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी तोफखाना पोलीस ठाण्यात गुरूवारी (20 फेब्रुवारी) पहाटे परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी दोन्ही गटाच्या नऊ जणांविरूध्द विनयभंग, मारहाण, धमकी, पोक्सो आदी कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
38 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी राहत असलेल्या परिसरात राहणार्या महिलेचा पुतण्या हा त्यांच्या मुलीचा मागील काही महिन्यांपासून पाठलाग करत होता. त्याने तिला धमकी दिली की, जर माझ्यासोबत लग्न केले नाही तर मी माझ्या जीवाचे बरेवाईट करून घेईल. या प्रकरणी विचारणा करण्यासाठी गेल्यावर चौघांनी शिवीगाळ व धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
तर दुसर्या गटाच्या 33 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या मुलीवर परिसरात राहणार्या दोघांनी अश्लील कृत्य करून जीव मारण्याची धमकी दिली. तसेच, इतर तिघांनी शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, सदरची घटना घडल्यानंतर दोन्ही गटाने तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेतली व गुन्हा दाखल केला.