अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शिक्षणासाठी नगरमध्ये आलेल्या अल्पवयीन दोन मुलींचे अज्ञाताने अपहरण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी 12 च्या सुमारास नगर शहरातील एका वसतिगृहाच्या गेटसमोर घडली. तसेच नेप्ती नाका परिसरातील एका रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीलाही (वय 17) अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याच्या घटनेतील एका अल्पवयीन मुलीच्या आजीने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या येरवडा, पुणे येथे राहत असून त्यांची नात (वय 15) आणि त्यांच्या नातीची मैत्रिण (वय 14 रा. भिंवडी) या दोघी नगर मध्ये शिक्षण घेत असून एका वसतिगृहात राहतात.
गुरूवारी त्या दोघी मुली फिर्यादी यांच्याकडे पुणे येथे आल्या. आम्हाला शिक्षण घ्यायचे नाही, असे त्यांनी फिर्यादीला सांगितले. फिर्यादी यांनी त्यांंना समजावून सांगितले. त्यानंतर शुक्रवारी त्या दोन्ही मुलींसह नगरला आल्या. वसतिगृहात आल्यानंतर दोघींना भूक लागल्याने त्यांना वसतिगृहाच्या गेटसमोर उभे करून फिर्यादी त्यांना खाण्यासाठी आणायला गेल्या. थोड्या वेळाने खाण्यासाठी घेऊन आल्यानंतर दोन्ही मुली तेथे दिसून आल्या नाहीत. सदरचा प्रकार फिर्यादी यांनी त्यांच्या नातीच्या मैत्रिणीच्या आई-वडिलांना फोन करून सांगितला. त्यांनी आजुबाजुचा परिसर आणि नातेवाईकांकडे शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाहीत. त्यांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.
शहरातील शिवाजीनगर परिसरात राहणार्या एका महिलेच्या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेले आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीची तब्येत खराब असल्याने फिर्यादीने तिला शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास नेप्ती नाका येथील एका रुग्णालयात नेले. डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतर औषधे आणण्यासाठी फिर्यादी मेडिकलमध्ये गेल्या असता मुलगी रुग्णालयाच्या पायरीवर बसलेली होती. मात्र, औषधे घेऊन परत आल्यावर फिर्यादीला मुलगी तिथे दिसली नाही. त्यांनी परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेऊनही मुलगी मिळून न आल्याने त्यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली आहे.