अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
एमआयडीसी जवळील निंबळक बायपास रस्त्यावर एका नाल्यामध्ये कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मागील महिन्यात शहरातून बेपत्ता झालेले उद्योजक दीपक परदेशी यांचा हा मृतदेह असल्याची चर्चा शहरात सुरू असून पोलीस प्रशासन मृतदेहाची पडताळणी करत आहे. दरम्यान गेल्या 22 दिवसांपासून गायब असलेले परदेशी यांचा घातपात झाला असून पोलीस त्या दृष्टीकोनातून तपास करत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.
दीपक परदेशी हे 24 फेब्रुवारी सायंकाळी घरातून बाहेर पडले होते. ते पुन्हा घरी परतले नाही. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार नोंदविण्यात आली होती. तेव्हापासून पोलीस परदेशी यांचा शोध घेत होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून देखील परदेशी यांचा शोध सुरू होता. तांत्रिक तपासाच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन संशयितांना सोमवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. त्यांच्या चौकशीतून परदेशी यांच्याबाबतची माहिती समोर आली.
तसेच निंबळक शिवारात बायपास रस्त्यावर नालीमध्ये मृतदेह असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र बेपत्ता असलेल्या परदेशी यांचा हा मृतदेह असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. पोलिसांनी मात्र याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. रात्री उशिरापर्यंत यासंदर्भातील पंचनामा, शवविच्छेदन बाबतची प्रक्रिया सुरू होती. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर मृतदेह कोणाचा आहे याची माहिती समोर येणार आहे.