कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargaon
वाढती महागाई, मतदार याद्यांतील कथित घोळ, राज्यातील दुष्काळी परिस्थिती तसेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील घडामोडींवरून आ. रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. शेतकर्यांना तातडीने मदत जाहीर करावी तसेच मतदार याद्यांची योग्य पद्धतीने दुरुस्ती झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
वाढत्या महागाईचा मुद्दा उपस्थित करताना रोहित पवार म्हणाले, पेट्रोल-डिझेलचे दर वाढले असून खाद्यतेल, खते आदींच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावरही त्यांनी टीका केली. इराणसारख्या तेल उत्पादक देशांशी संबंध सुधारून देशातील इंधनाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक होते, असे ते म्हणाले. शिक्षक व पदवीधर मतदारसंघांच्या मतदार याद्यांमध्ये बोगस नावे, मृत व्यक्तींची नावे तसेच हास्यास्पद नावे आढळल्याचा दावा त्यांनी केला. मतदार याद्यांमधील त्रुटी दूर होईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी करत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. या मुद्यावर इंडिया आघाडीतर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत त्यांनी शेतकर्यांना प्रति हेक्टरी एक लाख रुपये, शेतमजुरांना प्रति कुटुंब 25 हजार रुपये मदत देण्याची मागणी केली. तसेच महिला बचत गटांच्या कर्जाला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
आगामी मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी व दुष्काळग्रस्तांसाठी ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही रोहित पवार यांनी दिला. सत्ताधारी नेत्यांना गावात फिरू न देण्यासह समृद्धी महामार्ग व प्रमुख रस्ते रोखून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
जिल्हा बँकेच्या निवडणुक संदर्भातील घडामोडींवरही त्यांनी भाष्य केले. निवडणूक प्रक्रियेत नियमांचे पालन झाले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सहकार्यांवरील चौकशीच्या कारवायांबाबत बोलताना या कारवायांमागे राजकीय द्वेष असल्याचा आरोप त्यांनी केला.




