Thursday, March 13, 2025
Homeक्राईमथोरात समर्थक 24 नेत्यांवर गुन्हा दाखल

थोरात समर्थक 24 नेत्यांवर गुन्हा दाखल

चिखली येथील घटना || जाळपोळ व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

माजी खासदार डॉ. सुजय विखे यांची सभा संपल्यानंतर परतणार्‍या तरुणांच्या गाडीची जाळपोळ करून त्यातील कार्यकर्त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचे बंधू इंद्रजीत थोरात, स्वीय सहाय्यक भास्कर खेमनर, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष निखील पापडेजा यांच्यासह 24 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अशोक बाबुराव वालझाडे यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, की निमोण येथील सरपंच संदीप देशमुख हे आपल्या मित्रांसोबत आपल्या स्कॉर्पिओ गाडी (क्र.एम.एच.17, बीव्ही.4737) मधून माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या धांदरफळ येथील सभेसाठी गेले होते. सभा संपल्यानंतर ते आपल्या निमोण गावी परत जात असताना चिखली येथे जमावाने त्यांची गाडी अडवली. जमावातील काही युवकांनी या गाडीवर पेट्रोल टाकून गाडी जाळण्याचा प्रयत्न केला तर काहीजणांनी गाडीतील तरुणांना बेदम मारहाण करण्याचा प्रयत्न केला. याठिकाणी थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, स्वीय सहाय्यक भास्कर खेमनर, सुरेश थोरात, सुभाष लक्ष्मण सांगळे यांच्यासह 20 ते 25 युवकांचा जमाव होता.

यामध्ये शाबीर शफीक तांबोळी (रा. निमोण), सिध्दार्थ थोरात (रा.जोर्वे), गोरक्ष रामदास घुगे (रा. निमोण), वैष्णव मुर्तडक (रा. संगमनेर), शेखर सोसे (रा. मालुंजे), शरद पावबाके (रा. पावबाकी), सौरभ कडलग (रा. संगमनेर), हर्षल रहाणे (रा. चंदनापुरी), सचिन रामदास दिघे (रा. तळेगाव), अनिल कांदळकर (रा. तळेगाव), विजय पवार (रा. घुलेवाडी), गौरव डोंगरे (रा. संगमनेर), अजय फटांगरे (रा. घुलेवाडी), शुभम घुले (रा. गोल्डन सिटी, गुंजाळवाडी), शुभम जाधव (रा.जोर्वे), शुभम पेंडभाजे (रा. गोल्डन सिटी), भगवान लहामगे (रा. मालदाड रोड), निखील वेदप्रकाश पापडेजा (रा. घासबाजार, संगमनेर), रावसाहेब थोरात (रा. कवठे कमळेश्वर), भरत कळसकर (रा. रंगारगल्ली, संगमनेर) यांचा समावेश होता.

काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढणार्‍या संदीप देशमुखची गाडी आहे ती सोडू नका, असे पापडेजा ओरडून म्हणत होता. त्याने गाडीची चावी काढून घेतली. तसेच हातातील दांडक्याने व हाताने चालक संकेत यास मारु लागला. तसेच शेजारी बसलेल्या गिरीषलाही मारत होते. इंद्रजीत थोरात व सुभाष सांगळे खिडकीपाशी येवून म्हणत होते, की संदीप देशमुखची गाडी आहे तो कोठे लपला आहे? संकेत याने गाडीत संदीप नाही असे सांगितले तरी गाडी फोडा तो लपून बसला असेल असे गौरव डोंगरे, अजय फटांगरे, हर्षल रहाणे, शुभम पेंडभाजे हे ओरडून म्हणत होते. शुभम पेंडभाजे व हर्षल रहाणे यांनी खिडकीतून त्यांच्या हातातील बाटलीतून काहीतरी आत फेकले. गाडीत पेट्रोलचा वास आल्याने पेट्रोल गाडीत फेकल्याचे लक्षात आले.

इंद्रजीत थोरात व निखिल पापडेजा, भास्कर खेमनर, शेखर सोसे हे मोठमोठ्याने थोरात यांच्या विरोधात सभा करतात काय? येथेच जाळा यांना असे म्हणत होते. पेट्रोलचा वास सुटल्याने व दोन्ही बाजूने काठ्या कुर्‍हाडी घेवून लोक उभे असल्याने गाडीतील तरुण घाबरले. एकाने त्यांच्या उभ्या बोलेरो कॅम्पर गाडीतून (क्र. एम.एच.17, बी.वाय.4707) काहीतरी बाटलीत आणले व आमचे गाडीच्या मागील दारातून आत टाकले ती व्यक्ती हर्षल रहाणे होती. त्यावेळेस सुभाष सांगळे वाकून काहीतरी करत होता. त्यानंतर काही मिनिटांतच गाडीत आग लागल्याचे मला दिसले. पुढील 10-15 मिनिटांत पूर्ण गाडीने पेट घेतला. येथून सर्व जमाव काठ्या, कुर्‍हाडी उगारून अकोले बाजूकडे पळाला, असे अशोक बाबुराव वालझाडे (वय 48, रा. निमोण, ता. संगमनेर) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. यावरून पोलिसांनी वरील आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम 109, 118(1), 126(2), 189(2), 191(2), 191(3), 190, 326 (ग), 324(5), 223, मुंबई पोलीस कलम कायदा 37(1)(3), 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...