अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज (सोमवार) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. मात्र, महायुतीमध्ये अहिल्यानगरची जागा नेमकी कोणाकडे जाणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. जिल्ह्यातील बदललेले राजकीय समीकरण पाहता ही जागा भाजपकडे जाण्याची दाट शक्यता असून, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) गोटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.
महायुतीमधील जागावाटपाचा अंतिम निर्णय राज्य पातळीवरील 16 जागांच्या सूत्रावर ठरणार आहे. यापूर्वी ही जागा एकत्रित राष्ट्रवादीने लढवली होती, त्या आधारावर अजित पवार गटाने या जागेवर हक्क सांगितला आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपरिषद आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये नगर जिल्ह्यात भाजपचे संख्याबळ लक्षणीय वाढले आहे. जिल्ह्यात सध्या भाजप नंबर वन स्थानावर असल्याने भाजपने या जागेवर प्रबळ दावा ठोकला आहे. अखेरचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत घेणार असल्याने सर्वांचे लक्ष मुंबईकडे लागले आहे.
महाविकास आघाडीसमोर आव्हाने
दुसरीकडे, विरोधी महाविकास आघाडीची (मविआ) स्थितीही फारशी वेगळी नाही. मविआकडे मतदारांचे संख्याबळ अत्यंत कमी आहे. गेल्या वेळी ही जागा एकत्रित शिवसेनेने लढवली होती, ज्यात त्यांचा पराभव झाला होता. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडल्याने मविआची ताकद आणखी विभागली गेली आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडी काय रणनीती आखणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. जिल्ह्यातील संख्याबळाचा आकडा पाहता भाजपची भूमिका अत्यंत निर्णायक ठरणार असून, भाजपच्या संमतीशिवाय अहिल्यानगर विधान परिषदेच्या जागेचा निकाल लागणे अशक्य मानले जात आहे.
राजकीय संख्याबळ स्वीकृतसह
भाजप 207, राष्ट्रवादी शरद पवार (तुतारी) 30, शिवसेना उध्दव ठाकरे 6, काँग्रेस 31, राष्ट्रवादी अजित पवार (घड्याळ) 60, शिवसेना शिंदे गट (धनुष्यबाण) 47, आ. सत्यजित तांबे 31, माजी आ. प्राजक्त तनपुरे 20, शंकरराव गडाख 11, वंचित बहुजन आघाडी 3, बसपा 1, अपक्ष 8, एमआयएम 2, इतर 4 असे 461 नगरसेवक जिल्ह्यात आहेत.




